लाडकी बहीण योजनेवरून शरद पवार यांचा थेट मोदींना टोला; ‘त्या’ विधानाचीही करून दिली आठवण
पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी गुंतवणूक येईल हे योग्य आहे. पण मोदींची भाषा पाहिली तर ते सतत म्हणायचे की ही रेवडी आहे. हे रेवडीचं वाटप आहे. रेवडीचं वाटपानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे मोदी अनेकदा बोलले होते
राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्यी, त्यापैकीच एक होती ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यानंतर सरकारने ‘लाडका भाऊ’ योजनाही जाहीर केली. मात्र आगामी विधानसाभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सरकारने हा घोषणांचा पाऊस पाडल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांनी सरकारच्या या योजनेवरून टीका करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ‘ तिजोरीत काही नाहीये. या सर्व घोषणा आहेत. हे रेवडीचं वाटप आहे. रेवडीचं वाटपानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे’ असे शरद पवार म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेदरम्य़ान संवाद साधताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून टीका करत टोला लगावला, ‘ निवडणुकीच्यावेळी एखाद दुसरा हप्ता दिला जाईल. तो देऊन जनमानस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न दिसतो. पण लोकांमध्ये ही चर्चा आहे की, हे निवडणुकीच्या पूर्वीच देतील. या पूर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचा काही ना काही तरी परिणाम होईल.’ असा इशारा शरद पवार यांनी दिला.
ही लोकांची फसवणूक आहे
‘ शेवटी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी गुंतवणूक येईल हे योग्य आहे. पण मोदींची भाषा पाहिली तर ते सतत म्हणायचे की ही रेवडी आहे. हे रेवडीचं वाटप आहे. रेवडीचं वाटपानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. ही लोकांची तात्पुरती फसवणूक आहे. हे मोदी अनेकदा बोलले होते. त्या विधानाशी ते अजूनही प्रामाणिक असतील तर हे जे चाललंय त्यावर ते स्वच्छ भूमिका घेतील.’ असे शरद पवार म्हणाले.
पक्षातून गेलेल्यांना परत घेणार का ?
पक्षातून जे बाहेर पडले त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ‘ काही लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आमची नाही. जे लोक विचाराने आमच्यासोबत होते. एकत्र काम करण्याची मानसिकता ज्यांची आहे. त्यांच्याबद्दल विरोध करण्याची गरज नाही. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली होती, त्याचा विचार आमच्या पक्षात होईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल.’ असे त्यांनी नमूद केलं.