‘तर त्या गोष्टीला ही भेट छेद देणारी ठरेल’, अजित पवार-शरद पवार भेटीवर तटकरेंचं मोठं वक्तव्य

| Updated on: Dec 12, 2024 | 5:46 PM

"आम्ही गेली वर्षोनुवर्षे शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आलो आहोत. त्यांच्या आशीर्वादानेच आमच्या सर्वांची राजकीय वाटचाल झाली. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणं आणि त्यांचं दर्शन घेणं हा आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण असतो", असं सुनील तटकरे म्हणाले.

तर त्या गोष्टीला ही भेट छेद देणारी ठरेल, अजित पवार-शरद पवार भेटीवर तटकरेंचं मोठं वक्तव्य
ajit dada and sharad pawar
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे आज घडत असलेल्या घडामोडींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करत पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवणारे अजित पवार हे स्वत: आज सकाळी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवस निमित्त आपण भेट घेतल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या भेटीमागे वेगळं काही राजकारण आहे का? अशी चर्चा सुरु आहे. या भेटीवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

“आम्ही गेली वर्षोनुवर्षे शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आलो आहोत. त्यांच्या आशीर्वादानेच आमच्या सर्वांची राजकीय वाटचाल झाली. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणं आणि त्यांचं दर्शन घेणं हा आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण असतो. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देखील विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आलेले बघायला मिळाले होते. ही आपली एक राजकीय संस्कृती आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.

“मी कृपा करुन आपल्या सर्वांना विनंती करतो, आम्ही आज शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भेटलेलो आहोत. त्याला राजकीय वळण लावणं हे आजच्या सदिच्छा भेटीला छेद देणारं ठरेल. या भेटीतून कोणताही राजकीय अन्वार्य काढू नये, अशी आमची नम्रतेची विनंती आहे”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.