छगन भुजबळ कडाडले, गुन्हे मागे घ्या कसं म्हणता? मनोज जरांगे यांना सवाल, सरकारलाही दिला मोठा इशारा
मंत्री छगन भुजबळ बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवरच कडक शब्दात टीका केली. तसेच, मनोज जरांगे पाटील यांनाही थेट सवाल केला. जाळपोळ करणारी तुमची माणसं नाहीत, मग गुन्हे मागे घ्या कसं म्हणता? असा सवाल त्यांनी केला.
बीड | 6 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाला मी, माझी संस्था, माझा पक्ष यांनी कधीही विरोध केला नाही. मराठा समाजाचे आंदोलन झाले. नासधूस झाली. ज्यांची घरे जाळली ते नेते घरी सापडले असते तर त्यांना जीवे मारण्यात आले असते. प्रकाश सोळके यांचे घर पेटवले अशी बातमी आली. त्यावेळी मी मंत्रालयात होतो. सनराईज हॉटेलचे मालक त्यावेळी सोबत होते. त्याला संरक्षण द्या असे सांगितले. पण काही वेळातच ते हॉटेल संपूर्ण जाळण्यात आले. त्याची राख रांगोळी करण्यात आली. दोन चार पोलीस होते ते काहीही करू शकले नाहीत. जे काही राज्यकर्ते आहेत ते चुकीचे वागत आहे. याचा त्यांनी विचार करा. पोलिसांना हतबल करणे, फटाफट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हे काही चालले आहे ते चुकीचे चालले आहे. याचा वेळीच विचार करा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला दिला.
यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले की हे मराठी राज्य आहे. पण, जे राज्यकर्ते आहेत त्यांना काही समजत नाही की काय अशी परिस्थिती आहे. हे सगळं जे होत आहे ते चुकीचे होत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. ओबीसी हा एवढा मोठा समाज आहे पण त्याचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला जात आहे. हे सगळे षड्यंत्र आहे असा आरोप भुजबळ यांनी केला.
सावधानतेचा इशारा देत आहे.
आज राज्यात दहशत निर्माण केली आहे. आमदार यांची घरे दारे जाळता. ते असे काही निर्णय घेत आहेत त्यामुळे त्यांना सांगायचे आहे की तुम्हाला ओबीसी मते नको आहेत का? ती मते तुम्हाला नको का? ते म्हणतात भुजबळ यांना मते देऊ नका. पण, मग, तुम्हाला ओबीसी यांची मते नकोत का? ते ही असा विचार करतील तर तुचे काय होईल. वेळे गेलेली नाही. आताच सावधानतेचा इशारा देत आहे. मग, कुणी पक्ष असेल कुणी नेता असेल. त्याची पर्वा नाही असे भुजबळ म्हणाले.
ओबीसी यांना त्यांनी गृहीत धरले आहे
अजित दादा, शरद पवार, कॉंग्रेस, ओबीसी नेते यांनी सर्वांनी जातीगणना करा अशी मागणी केली आहे. पण, काही लोकांच्या मनात भ्रम आहे. ओबीसी यांना त्यांनी गृहीत धरले आहे. ज्यांच्या घरावर हल्ले झाले त्यांच्या घरात लहान लेकरे होती. त्यांची काळजी कुणी घ्यायची शिवाजी महाराज यांची प्रतिमा फोडली. ज्यांचे नाव घेता त्याचंही प्रतिमा फोडता? ही शिकवण दिली का? सगळ्यांनी, सर्व घटकांनी एकत्र येऊन आपला आक्रोश मांडला पाहिजे, असेही ते म्हणाले.
घराचे, हॉटेलचे नुकसान झाले त्यांनाही मदत
आमच्या जीवावर उठणाऱ्या ज्या शक्ती आहे ती कोण आहे? अशा ज्या शक्ती आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शासनाची आहे. ते कोण आहेत ते शासनाने शोधून काढावे. या हल्ल्यात कोटी रुपयांचे नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना जशी मदत जाहीर केली त्याचप्रमाणे ज्यांचे घराचे, हॉटेलचे नुकसान झाले त्यांनाही मदत दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांचे गुन्हे मागे घ्या असे का सांगता?
घरांवर दगड फेकण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करायला हवी. पण, सगळे गुन्हे माफ करण्यात आले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की जाळपोळ करणारी आमचे माणसे नाहीत. सरकारने आपल्या लोकांची घरे जाळली. तुमची माणसे नाहीत हे आम्ही मान्य करतो. मग, त्यांचे गुन्हे मागे घ्या असे का सांगता? ज्यांच्या घरावर हल्ले झाले त्यांच्या घरी मुले, बाळे आहेत की नाही ते पहिले नाही. जे कुणी होते ते असतील बाहेरचे. मराठा समाज हा समजदार आहे. त्यांना काय करायला पाहिजे ते कळत. मग आता बेकायदेशीरपणे जे वागत आहे ते कोण आहेत असा सवाल भुजबळ यांनी केला.