“राज ठाकरेंनी पहाटे कामाला लागावं…” राष्ट्रवादीच्या आमदाराचा खोचक सल्ला, म्हणाले “स्वत:च्या सुपुत्राचा पराभव…”
काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही, असा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली.

Amol Mitkari On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरेंनी प्रथमच निवडणुकांच्या निकालावर संशय व्यक्त केला. शरद पवार साहेबांचे ८ खासदार निवडून आले. त्यांचे १० आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार आला. त्यांचे ४१ आमदार येतात. चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही, असा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली. आता या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमोल मिटकरी यांनी नुकतंच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांबद्दल मांडलेल्या भूमिकेवरुन टीका केली आहे. राज ठाकरेंनी अजित पवारांसारखं पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे, असा सल्ला अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
“राज ठाकरेंना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यामुळे विधानसभेला स्वत:च्या घरात झालेल्या दारुण पराभवानंतर दीड महिन्यांनी ४२ जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसलाय. मात्र आपल्या सुपुत्राचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत, यावर त्यांनी भाष्य करावं. यासाठी त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे”, असे अमोल मिटकरी म्हणाले.
राज ठाकरे आज काय म्हणाले?
निवडणुकीचा निकाल लागल्यावर बरेच लोक भेटले. ज्या दिवशी निकाल लागला. मी बोलतो ते तुम्हाला समजत असेल. तुम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला. भाजपला १३२ जागा मिळाल्या. त्याआधी १०६ होत्या. त्या आधी १२२ जागा होत्या. ठिक आहे, समजू शकतो. अजित पवार ४२ जागा. चार पाच जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार यांना ४२ जागा मिळतात. कुणाचा तरी विश्वास बसेल का. जे इतकी वर्ष राज्यात राजकारण करत आले. अजित पवार, भुजबळ ज्यांच्या जिवावर मोठे झाले त्या शरद पवार यांना १० जागा मिळतात. हे न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे. ४ महिन्यापूर्वी लोकसभा झाली. सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे आले. १३ खासदार आले. एका खासदाराखाली पाच ते सहा आमदार येतात. किती आमदार काँग्रेसचे यायला हवे होते. सहा ते सहा नाही पकडलं. तीन किंवा चार पकडले. त्यांचे १५ आमदार येतात. शरद पवार साहेबांचे ८ खासदार निवडून आले. त्यांचे १० आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार आला. त्यांचे ४१ आमदार येतात. चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. तुम्ही कुठे मनात धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं. पण केलेलं मतदान कुठे तरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. अशा गोष्टी होत असतात. पण मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले