साहेब आपल्याला मंत्रिपद पाहिजे; कार्यकर्त्यांची मागणी, अन् अजितदादांच्या शिलेदारानं झापझाप झापलं
महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नेत्यांचा यावेळी पत्ता कट झाला आहे. त्यामुळे नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्ते देखील नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अखेर हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार देखील करण्यात आला. नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात पार पडला.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घतेली. तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्यानं जुन्या अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. यातील काही नेते नाराज आहेत.
दरम्यान अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीतून बंड केलं. तेव्हा त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील हे देखील होते. गेल्यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेलं नाहीये. मात्र दुसरीकडे साहेब आपल्याला मंत्रिपद पाहिजे अशी मागणी आता त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे.
साहेबर आपल्याला मंत्रिपद पाहिजे असं कार्यकर्त्यांनी म्हणताच दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं आहे. विधानसभेला 1500 मतांनी निवडून आलो आहे, आणि मला मंत्री करा अशी मागणी करू का? असा खोचक टोलाच वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांना यावेळी लगावला. आंबेगाव विधानसभा मतदार संघातून दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. यानिमित्त मतदारसंघात आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
या मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून मंत्रिपदाची मागणी करण्यात आली. मंत्रिपदाची मागणी होताच वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं. विधानसभेला 1500 मतांनी निवडून आलो आहे, आणि मला मंत्री करा अशी मागणी करू का? असा सवाल यावेळी वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केला. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक जुन्या नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला असून, मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.