गोविंदगिरी महाराजांकडून अयोध्येत शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य? रोहित पवारांचा नेमका आक्षेप काय?

| Updated on: Jan 22, 2024 | 8:33 PM

स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या लोकार्पणावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला. पण यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांनी गोविंदगिरी महाराजांना शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

गोविंदगिरी महाराजांकडून अयोध्येत शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य? रोहित पवारांचा नेमका आक्षेप काय?
Follow us on

मुंबई | 22 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम आज पडला. या कार्यक्रमात स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी व्यासपीठावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेलमला जाऊन मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी संन्साय घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांना परत स्वराज्यात नेलं, असं वक्तव्य गोविंदगिरी महाराज यांनी केल. त्यांनी आपल्या भाषणात समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते, असंदेखील वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय.

“सन्माननीय गोविंदगिरी महाराज, आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही”, अशी भूमिका रोहित पवार यांनी ट्विटर मांडली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

गोविंदगिरी महाराज शिवाजी महाराज नेमकं काय म्हणाले?

“पंरपरेला पाहता केवळ एक राजाची आठवण होते ज्याच्याकडे हे सर्व होतं, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वत: मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी शेलमला गेले तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला, ते तीन दिवस शिव मंदिरात राहिले. महाराजांनी सांगितलं की, मला राज्य करायचं नाही तर मला संन्यास घ्यायचा आहे. मी शिवाच्या आराधनेसाठी जन्माला आलो आहे. मला संन्सास घ्यायचा आहे, मला वापस घेऊन जाऊ नका. इतिहासातला हा सर्वात मोठा आणि विलक्षण प्रसंग आहे. या प्रसंगावेळी त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंदिरांनी त्यांना समजावलं आणि वापस आणलं. त्यांना सांगितलं की, हे आपलं कार्यही भगवान सेवाच आहे”, असा दावा गोविंदगिरी महाराज यांनी केला.

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचं भाष्य

“आज आपल्याला एक महापुरुष अशाप्रकारे प्राप्त झाले ज्यांना भगवती जगदंबाने स्वत: हिमालयाहून वापस पाठवलं की, जा आणि भारत माताची सेवा करा, तुम्हाला भारत मातेची सेवा करायची आहे”, असं गोविंदगिरी महाराजांनी सांगितलं. “काही स्थान असे असतात, आदराने आपलं मस्तक झुकतं, असं एक स्थान दिसलं तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी यांची आठवण आली. ते शिवाजी महाराजांबद्दल म्हणाले, निश्चयाचा महामेरु, बहुत जणांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी”, असं गोविंदगिरी महाराज आपल्या भाषणात म्हणाले.