‘सुप्रिया सुळे संसदरत्न पण आरोपींसोबत फोटो कसे?’, ड्रग्ज प्रकरणी शिंदे गटाचा सर्वात मोठा आरोप
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलंय. या प्रकरणात एकूण आठ नावे सापडली आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या दोन मंत्र्यावर थेट आरोप केले होते. मात्र. आज शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केलाय.
मुंबई | 25 ऑक्टोंबर 2023 : ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक झाली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश दिले होते. परंतु. या प्रकरणात आमच्या मंत्र्यांवर आरोप केले गेले. मंत्री दादा भूसे, मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर आरोप केले. पण, ज्यांनी आरोप केले त्यांना कुणाचा आशिर्वाद होता, असा सवाल शिंदे गटाच्या सचिव आणि प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली.
2020 मध्ये ललित पाटील हे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते होते. ललित पाटील याला शिवबंधन बांधतानाचे त्यांचे फोटो समोर आले होते. ड्रग्ज प्रकरणात गणेश शर्मा, गोविंदा साबळे अशी एकूण आठ नावे सापडली आहेत. त्यातील कळवा मुंब्रा येथील सलमान फाळके हे नावही समोर आले आहे. सलमान फाळके याच्याकडे ५४ ग्राम एमडी ड्रग्ज सापडले. त्याच्यासोबत शानू पठान हा ही होता असे त्यांनी सांगितले.
सलमान फाळके यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत फोटो आहे. शानू पठान हा जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत फोटोत दिसतोय. सुप्रिया सुळे यांच्यासोबतही सलमान फाळके याचे फोटो आहेत. हे फोटो बोलके आहेत. तुम्ही काचेच्या घरात राहता आणि दुसऱ्याचा घरावर दगड फेकता अशी टीका त्यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे या संसदरत्न आहेत. पण, त्याचे आरोपींसोबत फोटो कसे? जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांनी याचे उत्तर द्यावे असे त्या म्हणाल्या.
शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून आता भक्ती शक्ती संवाद यात्रा काढली जाणार आहे. पंढरपूरमधील विठ्ठल मंदीरात दर्शन घेऊन या यात्रेची सुरूवात केली जाणार आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे राज्य प्रमुख अक्षय महाराज भोसले याचे नेतृत्व करतील. राज्यातील ३६ जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन त्या ठिकाणी उपयुक्त सोई सुविधांचा आढावा घेतला जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या यात्रेला सुरूवात होणार आहे. एकूण ३५८ तालुक्यातील ४०० हून अधिक मंदिरांना भेट देऊन हिंदुत्ववादी विचार पुढे नेले जाणार आहेत, अशी माहितीही मनीषा कायंदे यांनी दिली.