महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाचे वारे, राष्ट्रवादी काँग्रेसभोवती संशयाचं वादळ, भाजपचा प्लॅन B, सुप्रिया सुळेंनी एक-एक दावा अक्षरशः…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र हे सर्व दावे खोडून काढलेत. पण 15 मिनिटांनी पाऊस पडेल का, हे मीही सांगू शकत नाही, अशी मिश्किल टिप्पणीदेखील केली.
मुंबई : राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. राजकीय नेत्यांच्या वेळोवेळी बदलत्या भूमिकांमुळे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या (Maharashtra Politics) रात्री-अपरात्रीतून घडलेल्या घडामोडींमुळे काहीही घडू शकतं, यावर आता जनतेचा पक्का विश्वास बसलाय. सुप्रीम कोर्टात एकिकडे शिंदे गटातील 16आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. या खटल्यावर कोणत्याही क्षणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टाचा निकाल शिंदेंच्या विरोधात लागला तर पुढे काय? भाजपची आणखी कोंडी होणार का, अशी चर्चा असतानाच भाजप आता बॅकअप प्लॅन तयार करतंय, असंही म्हटलं जातंय. गेल्या काही दिवसात शरद पवार यांची विविध मुद्द्यांवर बदललेली भूमिका, अजित पवार यांचं अचानक १७ तास गायब होणं, अंजली दमानियांचं भाष्य, भाजपचा प्लॅन बी या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेसभोवती संशयाचं वादळ घोंगावतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र हे सर्व दावे खोडून काढलेत. पण 15 मिनिटांनी पाऊस पडेल का, हे मीही सांगू शकत नाही, अशी मिश्किल टिप्पणीदेखील केली.
सुप्रिया सुळेंनी ‘हे’दावे खोडले
- अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि भाजपची युती होईल, असं ट्विट केलंय. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ अंजली दमानिया यांनी काय ट्विट केलं मला माहिती नाहीय, पण प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे…
- ईव्हीएम मशीनविरोधात देशातील बहुतांश पक्षांनी आवाज उठवला आहे. मात्र अजित पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. यावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ अजित पवारांनी ईव्हीएमबाबचे प्रेझेंटेशन अजून बघितलं नाही, त्यामुळे त्यांनी ईव्हीएमबाबत तो स्टॅण्ड घेतला असावा.. ‘ काही आठवड्यापूर्वीच नवी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक झाली. या ईव्हीएम मशीन कशी हॅक केली जाऊ शकते, यावरून प्रेझेंटेशन झालं, त्यासंदर्भाने सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलंय.
- राज्यात काल घडलेली मोठी घडामोड म्हणजे शरद पवार यांच्या घरी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची झालेली भेट. यावेळी सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. महाविकास आघाडीतील अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
- तसेच शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर यामुळे टीका केली जातेय.. मात्र सुप्रिया सुळेंनी हा चर्चाही फेटाळल्या. त्या म्हणाल्या, ‘ मोठ्यांच्या घरी जाणे त्यात कसला कमी आहे? इगो ठेवण्याची गरज नाही.. आमचे तसे संस्कार नाही.. उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटीवर शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.
- शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटीबद्दल मला जास्त माहिती नाही. भेटीत बाळासाहेबांच्या आठवणीवर चर्चा झाली, ताडोबा जंगलातील वाढलेल्या वाघाबाबत भेटीत चर्च्याचं त्यांनी सांगितलं.
- गौतम अदानी प्रकरणी विरोधकांनी संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीची मागणी केली आहे. शरद पवार यांनी मात्र परस्पर विरोधी भूमिका घेतली आहे. यावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ जेपीसी चौकशीबाबतची आमची भूमिका आजची नाही. संसदेतही आम्ही तीच भूमिका मांडली आहे..
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतांना सहकारी पक्षांशी चर्चा केली नाही, असं शरद पवार म्हणालेत. त्यावरूनही सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलंय. शरद पवार यांनी काहीतरी विचार करूनच असं बोलले असतील.. असं त्या म्हणाल्या.