शरद पवारांचे फोटो वापरु नका, स्वतंत्र पक्ष… अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
आता सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला मोठा झटका दिला आहे. "विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा", असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत.
NCP Sharad Pawar Ajit Pawar SC Case : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर लगेचच दोन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला मोठा झटका दिला आहे. “विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र पक्ष म्हणून लढा”, असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले होते. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पक्ष आणि चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश पाळले जात नसल्याचा आरोपही शरद पवार गटाने केला होता. या याचिकेवर ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यात आली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत ३६ तासात वृत्तपत्रात जाहिरात द्या असे आदेश दिले होते. यानतंर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
“शरद पवारांचे फोटो वापरु नका”
नुकत्याच झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अजित पवार गटाने स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढावी. एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा. तसेच तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ वापरू नका, असा सूचना करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच आम्ही दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. सगळ्या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर लिहा, असेही कोर्टाने अजित पवार गटाला सांगितले आहे.
“निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करा”
अजित पवार गट आणि शरद पवार गटाने निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. अजित पवारांकडून वारंवार शरद पवारांच्या फोटोचा वापर केला जातो, अशी तक्रार शरद पवारांच्या वकिलाने केली आहे. याप्रकरणी बोलताना कोर्टाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं. दरवेळी मतदारांवर व्हिडीओ वगैरेचा प्रभाव पडेलच असे नाही, कधी कधी तो प्रभाव पडतो. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असा सल्ला कोर्टाने दिला.
“तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे”
यावेळी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जरी तो व्हिडीओ जुना असेल किंवा काहीही असले तरी तुम्ही शरद पवारांचा चेहरा का वापरता? असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला. तुमच्या सगळ्या उमेदवारांनी शरद पवारांचे फोटो , व्हिडीओ कशाला वापरले पाहिजे. जर तुमचे वैचारिक मतभेद आहेत, तर तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, असे अजित पवार गटाला खडसावले. आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांचे फोटो व्हिडीओ वापरत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार गटाने दिले.