बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, अख्ख्या महाराष्ट्राला कळालंय, रोहित पवार यांचा मोठा दावा
शिंदे-भाजप सरकारच्या कारभारावरून एकिकडे महाविकास आघाडीने आरोपांचं रान पेटवलं असतानाच शिंदे सरकारमधील अनेकजण मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत मोठं भाष्य केलंय.
अभिजित पोते, पुणे : एकनाथ शिंदे-फडणवीस (Eknath Shinde- Fadanvis) सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर (Cabinet expansions) अनेक महिने उलटले तरीही दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होताना दिसत नाहीये. दुसऱ्या टप्प्यात आपली मंत्रिमंडळावर वर्णी लागावी, म्हणून अनेक आमदारांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते. अनेकांनी आपली नाराजी उघड बोलूनही दाखवली. या मालिकेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अपक्ष आमदार बच्चू कडूदेखील होते. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारला चांगलाच इशारा दिला होता. मात्र बच्चू कडू यांना आता मंत्रिपद मिळणार नाही, हे त्यांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय, असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलंय. याचं गणितही त्यांनी समजावून सांगितलंय. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, याबाबतही भाकित केलंय. टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी विशेष चर्चेदरम्यान रोहित पवारांनी हे भाष्य केलं.
बच्चू कडूंचं लॉजिक काय?
बच्चू कडू यांना आता मंत्रिपद मिळणार नाही हे कळून चुकलंय, असं रोहित पवार याम्हणाले. यासाठी त्यांनी गणितही सांगितलं. ते पुढीलप्रमाणे-
- – एकनाथ शिंदे गटातल्या ४० जणांनाही मंत्रिपद हवंय. तसंच भाजपच्याही अनेक नेत्यांना मंत्रिपद पाहिजे.
- रेशो काढला तर पाच आमदाराच्या मागे एक मंत्रिपद येऊ शकतं. अशा स्थितीत एकनाथ शिंदेंचा गट १२ च्या पुढे किंवा १४ पर्यंत राहिल.
- बाकीच्या २६ लोकांना काय मिळणार? त्याला एक पर्याय आहे. आपल्याकडे अनेक मंडळं आहेत. यांनी मंडळं वाढवले आहेत. अधिवेशनात त्यांना निधी दिलेला नाही. फक्त भाषण केलं. जेव्हा मंडळं येतील तेव्हा आमदारांना त्यांचं वाटप होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
कोर्टातही टांगती तलवार
सरकारचा एकिकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असताना कोर्टातही त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे सध्याचं सरकार लोकांचा आणि जनतेचा विचार करत नाही. त्यांना फक्त भाजपच्या काही लोकांना आणि शिंदे यांच्या ४० लोकांना खुश ठेवायचंय, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय.
आता थर्ड ग्रेडला पोहोचलो
सध्याचं राजकारण आता थर्ड ग्रेडला पोहोचलंय, अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली. सध्या राजकीय लोकं ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर राजकारण घेऊन जात आहेत. ते महाराष्ट्राच्या भविष्याशी खेळत आहेत. अशा वक्तव्यांतून तरुणांची पोटं भरणार नाहीत. त्यांच्या हाताला काम मिळणार नाही. आपल्या आधीच्या पिढीने ज्या स्मृती जपल्या त्याला तडा देत आहात, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय.