जावयाने सासू-सासऱ्यांचेही पाय धुतले पाहिजे, सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी; चर्चा तर होणारच
धोंड्याचा महिना सुरू झाला आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात लगबग सुरू झाली आहे. या महिन्यात जावयांची खास उठबस असते. त्यांच्यासाठी खास जेवणाचा बेत आखला जातो. कपडेलत्ते घेतले जातात. त्यामुळे जावयांचा थाट काही औरच असतो. मात्र, या सर्व मुद्द्यांवरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केलं आहे.
धोंड्याचा महिना म्हणजे श्रावणमास सुरू झाला आहे. या महिन्यात जावईबापूंना विशेष मान दिला जातो. त्यांना जेवायला येण्याचं सासूरवाडीतून खास आमंत्रण दिलं जातं. या निमित्ताने शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मिश्किल विधान केलं आहे. दर 3 वर्षांनी धोंडे जेवण करून सासू-सासऱ्यांना जावयाचे पाय धुवायला लावू नका. आता मी धोंडे जेवणाची प्रथा बदलणार आहे. त्याची सुरुवात माझ्या मतदारसंघातून करणार आहे. इतकी चांगली बायको दिली म्हणून या महिन्यात आता जावयाने आपले आईवडील आणि सासूसासऱ्यांचे पाय धुतले पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. धोंडे जेवण काय असतं हे मला माहीत नव्हतं. पण मला रिलमार्फत कळलं. मी दररोज फक्त 5 मिनिटे रिल बघते, हे मी कबूल करते. पण 5 मिनिटानंतर लॉक होतं. माझ्या मोबाईलला तशी सिस्टिम आहे. तुम्हीही जास्त रिल बघू नका. आज पुण्यामध्ये रिलच्या बनवायच्या नादात तरुण अनेक गंभीर गोष्टी करत आहेत, ह्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज, रीलमध्ये सेफ्टी फर्स्ट ठेवा, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.
महिलांचा सन्मान 365 दिवस असावा
पुण्यात महिलांच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. या कार्यक्रमाला आज 3 वर्ष होत आहेत. या महिला धोरणाला तीन दशके पूर्ण होत आहेत. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशी असायचा. पण एक दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा 365 दिवस मानसन्मानं ठेवला पाहिजे. त्यामुळेच आपण कार्यक्रमाचा दिवस बदलला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ही रिटायर न होणारी मंडळी
थरमॅक्स कंपनीच्या अणू वाघ या सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेलं शिक्षणाचं काम पुढे नेत आहेत. टीच इंडिया मार्फत त्या हे काम करत आहेत. अणू वाघ आणि पवार साहेब ही कधीही रिटायर न होणारी मंडळी आहेत, असं त्या म्हणाल्या.
तंत्रज्ञानाची ट्रेनिंग आवश्यक
महिला धोरण आल्यानंतर अनेक महिलांना संधी मिळाली. पण ते आरक्षण संपल्यानंतर पुढं काय? असा सवाल त्यांनी केला. आता नवीन डीप फेक नावाची गोष्ट आली आहे, व्यवसाय करणाऱ्या अनेक लोकांना ह्या डार्क नेट आणि डीप फेक मार्फत फसवलं जातंय. त्यामुळं तंत्रज्ञानाचं ट्रेनिंग आवश्यक आहे. बदलणारं तंत्रज्ञान आणि इतर सर्व गोष्टीचा अभ्यास करून दर पाच वर्षांनी धोरणामध्ये बदल अवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या.