स्ट्रॅटेजीनुसारच वाल्मिक कराड शरण, 302 चा गुन्हा का नाही?; जितेंद्र आव्हाड कडाडले
याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार घणाघात केला आहे. आतापर्यंत वाल्मिक कराड हजर का झाला नाही, आज का हजर झाला, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Jitendra Awhad on Walmik Karad : बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच आता बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. आता याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार घणाघात केला आहे. आतापर्यंत वाल्मिक कराड हजर का झाला नाही, आज का हजर झाला, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थितीत करुन आरोप केले आहेत. वाल्मिक कराडला अजून ३०२चा आरोपी कुठे केलंय, खंडणीच्या गुन्ह्यात घेतलं. खंडणीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन महिने. जामीन तर होणारच, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
“आजपर्यंत का हजर झाले नाही. आज का हजर झाले. यांची चूक सापडली यांच्या अजून किती चूका सापडायच्या. बापू आंधळेच्या केसमध्ये पोलिसांनी याला का नाही अरेस्ट केलं. ३०७ चा आरोपी आहे तो. बाकीचे आरोपींना अरेस्ट केलं. याला का नाही केला. ज्या केज पोलीस ठाण्यात सरेंडर होतोय, त्या केजमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत. ते आंधळेच्या मर्डर केसचे तपास अधिकारी आहे. केजचे जे आता अधिकारी आहेत, त्यांनीच वाल्मिकला मदत केली आहे. ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून याला ३०७ चा आरोपी करून गितेला ३०२चा आरोपी करून याला मोकळा सोडला. कालपरवा पर्यंत हा परळीच्या पोलीस ठाण्यात जाऊन बसायचा. पोलिसांसोबत पार्ट्या झाल्या याच्या. हजारवेळा महाजनबरोबर पार्ट्या झाल्या”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“अजून ३०२चा आरोपी कुठे केलंय?”
“ही प्लॅन स्ट्रॅटेजी होती. त्यानुसार चालू होतं. तो पुण्यात हजर होतो, त्या अर्थी तो पुण्याच्या आसपास आहे. त्याच्याबरोबर कोण आहेत हे कळत नव्हतं. नवीन नवीन गॅझेट आलंय याला शोधता आलं नाही. लोकांच्या मनात संशय आहे. माझ्या मनात संशय आहे. याला अजून ३०२चा आरोपी कुठे केलंय. खंडणीच्या गुन्ह्यात घेतलं. खंडणीच्या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन महिने. जामीन तर होणारच. परळी शहरातील पोलीस स्टेशनमध्ये बापू आंधळे नावाची मर्डर केस आहे. त्या हा आरोपी आहे. मग एवढे दिवस”, असेही जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.
“ही जातीपातीची लढाई नाही”
“परळीत एका घरावर हल्ला झाला. आंधळे मेला. त्याला मारायचा नव्हता. पण तो मेला. महाजन नावाचा अधिकारी होता. त्याने वाल्मिक कराड नाव न लिहिता वाल्मिक अण्णा लिहिलंय. त्यानंतर वाल्मिक १०० वेळा पोलीस ठाण्यात गेला. पण तू गुन्हेगार आहे हे सांगण्याची पोलिसांची हिंमत झाली नाही. दुर्देवाने आता महाजनच या प्रकरणात गेला. ही जातीपातीची लढाई नाही. हे आर्थिक प्रकरण आहे”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.