सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची जीभ घसरली, म्हणाले….
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर तीव्र टीका केली आहे. खोत यांच्या शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ढोबळे यांनी खोत यांना "लायकी नसलेला माणूस" असे संबोधले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांची भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना लक्ष्मणराव ढोबळे यांची जीभ घसरली. सदाभाऊ खोत हा लायकी नसलेला माणूस आहे, अशी खोचक टीका लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. “कोंबडी चोर भाड्या हे तुझे वक्तव्य नालायकपणाचे आहे असे त्याला मी म्हटल्यावर काय वाटेल? यापेक्षा या चोराने या पद्धतीने बोलायलाच नको होतं. या दरोडेखोराने या पद्धतीने नासक्या आंब्याचे गुण दाखवायला नको होते. परंतु त्याने दाखवले”, असा घणाघात लक्ष्मणराव ढोबळे यांनी केला.
भाजप हा विरोधक आहे. बाकीचे गिनतीमध्ये येत नाही, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी काल राष्ट्रवादी पक्षाची खिल्ली उडवली होती. याला उत्तर देताना ढोबळे यांनी प्रणिती शिंदे संस्कार नसलेली पोरगी आहे, अशी टीका केली. “सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर मिळालेल्या निकालावर एवढ्या लवकर अशा पद्धतीने उतराई होणं ताईंना योग्य वाटत नाही. पण वकील झाल्यामुळे त्यांना इतर पक्ष चिल्लर वाटत आहेत. कायद्यासमोर सगळे समान असतात. संस्कार नसलेली पोरगी काही बोलली असेल तर आपण दुरुस्त करू. या त्यांना नाव ठेवण्यापेक्षा त्यांना माफ करूया”, असं लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले.
‘पुन्हा एकदा कारण नसताना लांडगा बोकांडी बसेल’
“पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन माणसे उभे राहिल्यामुळे मताचे विभाजन होईल आणि पुन्हा एकदा कारण नसताना लांडगा बोकांडी बसेल”, असे म्हणत लक्ष्मणराव ढोबळे यांनी समाधान अवताडे यांच्यावर टीका केली. “मला माझ्या नेत्याजवळ यावं असं वाटलं म्हणून मी भाजपा सोडून राष्ट्रवादीत आलो मी कोणावरही नाराज नाही”, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मी भाजपकडे उमेदवारीच मागितली नाही. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण विजयी होईल या प्रश्नावर लोकांच्या मनातलं जाणायला थोडा वेळ लागेल”, असे सूचक वक्तव्य माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले.