सुप्रिया सुळे यांना दगाफटका झाला तर… शरद पवार गटाचा बारामतीसाठी प्लान बी काय?
मी पहिल्यांदाचं ऐकतीय की, माझ्या मतदारसंघात बाहेरून यंत्रणा चालवली जात आहे. हे कसं होतंय... कोण आहेत हे लोकं, काही यंत्रणा बाहेरून लावली जात आहे आणि कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवला जात आहे. याची उत्तरं मी नाही देऊ शकत, असं शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराण्यातच लढाई होणार आहे. शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात ही लढाई होत आहे. नणंद-भावजयी एकमेकींच्या विरोधात उभ्या टाकल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी आणि अत्यंत चुरशीची निवडणूक असल्याचं सांगितलं जात आहे. पत्नीला निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. तर मुलीला निवडून आणण्यासाठी शरद पवार यांनी नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना दगाफटका होऊ नये म्हणून शरद पवार गटाने बी प्लानही तयार ठेवला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीकडून सुद्धा खबरदारी घेण्यात आली आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहू नये म्हणून पर्यायी उमेदवार म्हणून सचिन दोडके यांचाही उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सचिन दोडके हे बारामतीचे ‘डमी’ उमेदवार असणार आहेत. बारामतीची निवडणूक एकतर्फी होऊ नये म्हणूनच शरद पवार गटाने हा प्लान तयार केला आहे.
एकाच दिवशी अर्ज भरणार?
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सुप्रिया सुळे या 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्याबरोबरच सचिन दोडके यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे.
डमी फॉर्म भरलाच जातो
दरम्यान, डमी फॉर्मच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी तीन वेळा निवडणूक लढली आहे. अशावेळी डमी फॉर्म भरलाच जातो. तीनही वेळेस मी आणि माझ्यासोबत एक डमी फॉर्म सहकार्याचा किंवा कार्यकर्त्याचा भरलेला आहे. आता त्यांनी दोन किंवा तीन फॉर्म का भरलेले आहेत? घरातले का भरले आहेत? याचं उत्तर त्यांनाचं विचारायला लागेल. 18 तारखेला 11 वाजता आम्ही सर्वजण फॉर्म भरणार आहोत, त्यादिवशी सगळी माहिती तुम्हाला मिळेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
डेटा काढून बघा
माझ्या मतदारसंघात मी किती फिरत आहे याचा डेटा बघा. मी किती फिरते यावर त्यांचे आधीची भाषणं काढून बघा. अजितदादा, जयंतराव मला म्हणायचे किती प्रवास करतीयेसं तू. किती वेळा मतदारसंघात जातेस? असंही त्या म्हणाल्या.
अजितदादांना उत्तर
काही लोकांना संधी मिळाली, पण त्यांनी संधीचं सोनं केलं नाही, असं अजित पवार म्हणाले होते. अजितदादांच्या या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. ही टीका कुणावर त्यांनी केली आहे माहिती नाही. या देशात आज अनेक मंत्री होऊन गेले. आज या देशातले कृषिमंत्री कोण आहेत सांगा बरं नाव?. किती लोकांना हे नाव माहिती आहे?. पण मधु दंडवते, बॅरिस्टर दातपई यांचं नावं आजही लोकं अभिमानाने घेतात. मी कधी मंत्री नव्हते, असं त्या म्हणल्या.