प्रफुल पटेल यांच्या कृतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा निशाणा; म्हणाले, हा तर महाराजांचा अवमान…
NCP Sharadchandra Pawar on Prafull Patel Maharshtra Politics : प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरेटोप घालण्यावरून राजकारण पेटलं आहे. विरोधकांकडून प्रफुल्ल पटेल यांच्या कृतीचा निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही महाराष्ट्रात सभा होत आहे. नरेंद्र मोदी यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घालत नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. मात्र त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अवमान असल्याची टीका विरोधक करत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीनेही याबाबतचं ट्विट करण्यात आलं आहे. तर हिंदू महासंघानेही आक्षेप घेत अजित पवार गट आणि भाजपने माफी मागावी, अशी मागणी केलीय.
पवार गटाकडून निषेध
शरदचंद्र पवार पक्षाकडून याबाबतचं ट्विट करण्यात आलं आहे. जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो. परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!, असं राष्ट्रवादीच्या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.
जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी… pic.twitter.com/D1iutv3BDL
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 14, 2024
हिंदू महासंघाकडून माफीची मागणी
प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला. यावर हिंदू महासंघानेही आक्षेप घेतला आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे यांची प्रफुल्ल पटेलांवर टीका केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच अपमान केला आहे. राष्ट्रवादीसहित भाजपच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे. हिंदू महासंघ गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार, असं आनंद दवे म्हणाले.
भाजपची प्रतिक्रिया काय?
भाजपकडूनही या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया आली आहे. नरेंद्र मोदीचा त्यामध्ये दोष काय आहे? कधी कधी कुणी काही घातलं त्यात मोदीजीचा दोष काय? मला याविषयी अधिक माहिती नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.