अजित पवार यांच्याबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान, वाद नाहीत… आम्ही त्यांच्यासोबत…
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल यावर अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याबाबत तशा पद्धतीची चर्चा अजून तरी झालेली नाही. त्याबद्दल निर्णय झाल्यास कळवू. मात्र, जे आवश्यक आहे, जे होणार आहे ते करावेच लागते.
कोल्हापूर : 21 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळेच शरद पवार यांची कोल्हापुरात सभा होत आहे. कोल्हापूर नंतर त्यांच्या जळगाव आणि पुणे येथे सभा होणार आहेत. कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो राष्ट्रवादीनेच लढावा अशी आमची इच्छा आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणूक खूप लांब आहे. यादरम्यान पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्याविरोधात जनता आहे आणि जनतेपर्यंत जाऊन पवारसाहेब आपली भूमिका मांडत आहेत. शरद पवार साहेब यांच्याबद्दल हसन मुश्रीफ यांना आदर आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगतील. कोल्हापूरच्या 25 तारखेच्या सभेत याची उत्तरे मिळतील. तसेच, महाविकास आघाडीच्या सभादेखील लवकर सुरु होतील, असे जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार नेहमीच पुरगोमी विचाराचे राहिले आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रात जपणे आवश्यक आहे. जनतेमध्ये समतेचा संदेश देणे गरजेचे आहे. पवार साहेब ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत. हा गैरसमज काही जण पसरवत आहेत.
त्यांना अडचणीत आणणार नाही…
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे बाहेर आले. त्यानंतर आम्ही काहीजणांनी जाऊन त्यांची भेट घेतली. मलिक यांना किडनीचा त्रास सुरु झाला आहे. विश्रांती घेण्यासाठी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ते राजकीय विषय कोणाशीही बोलत नाहीत, त्यामुळे त्यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, त्यांच्यासंदर्भात राजकीय बोलून मी त्यांना अडचणीत आणणार नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्यासोबत वाद नाही
जे पवार साहेबांना सोडून गेले ते आजही साहेबांना मानतात. ते आग्रहाने सांगतात की ते माझा विठ्ठल आहे. जे गेले ते पवार साहेबांचा फोटो लावतात त्यावर मी आक्षेप घेणे बरोबर नाही. पवार साहेबांनी राजकारणात त्यांना आणले नसते तर ते आजपर्यंत या ठिकाणी पोहोचले नसते. अजित पवार आणि माझ्यामध्ये कोणतेच वाद नाहीत. आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत त्यांच्यासोबत राहिलोय असेही पाटील म्हणाले.