बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतल्यानंतर मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शिरुर कासार इथं जेव्हा धनंजय मुंडे दाखल झाले त्यावेळी जेसीबी मशीनमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर एक भला मोठा हार क्रेनच्या माध्यमातून त्यांना घालण्यात आला. कार्यकर्त्यांकडून झालेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे धनंजय मुंडे भारावल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.(NCP workers welcome Dhananjay Munde in Beed district)
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ध्वजारोहण पार पडल्यानंतर मुंडे बीडच्या विश्रामगृहात थांबले. त्यावेळी मुंडे यांना भेटण्यासाठी नागरिकांनी नेहमीप्रमाणे तोबा गर्दी केली होती. त्यावेळी नागरिकांच्या प्रश्नांवरुन मुंडे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतलं. कामात कुठलीही हयगय नको अशी तंबी मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिली. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पोलीस परेड करत मानवंदना देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह बीडकरांनीही यावेळी मोठी गर्दी केली होती. मुंडे यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या विकासकामात कधीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.
”एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. अशा कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी माझ्या पाठीशी ताकद उभी केली. मी शब्दात आभार मानू शकत नाही. माझ्या अंगावरील कातड्याचे जोडे करून, आपल्याला घातले तरीही आपले उपकार फिटू शकत नाहीत’, अशी भावना मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानं धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर या प्रकरणाला मिळालेल्या नाट्यमय वळणानंतर हे प्रकरण संपलं. मात्र, त्यावरील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया अद्यापही सुरूच आहे. पंकजा मुंडे या आज औरंगाबादमध्ये होत्या. यावेळी त्यांना धनंजय मुंडे प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा, ‘तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही’, असं पंकजा म्हणाल्या. पण ही प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही.
‘कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच’, असंही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या :
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, भाजप महिला आघाडी आक्रमक
बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?
NCP workers welcome Dhananjay Munde in Beed district