कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये शिक्षकांना शाहू महाराजांच्या प्रचाराची सक्ती, गंभीर आरोप करत महायुतीचे पदाधिकारी आक्रमक
कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी शिक्षकांना सक्ती करण्यात आल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी न्यू कॉलेजमध्ये दाखल झाले. छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचासाराठी न्यू कॉलेजमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आग्रह केला जात आहे, त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, सक्ती करण्यात येत आहे , असा गंभीर आरोप करण्यात आला.
लोकसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचारालाही वेग येत आहेत. सर्वच पक्षांनी जवळपास त्यांचे उमेदावर जाहीर केले असून त्यांचा प्रचार धडाक्यात सुरू झाला आहे. कोल्हापुरातही निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. मात्र त्यातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी शिक्षकांना सक्ती करण्यात आल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी न्यू कॉलेजमध्ये दाखल झाले आहेत.
काय आहे प्रकरण ?
कोल्हापुरात लोकसभेचं वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांचा फैरीही झडत आहेत. महाविकास आघाडीने कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शाहू महाराज यांनी कोणतीही उमेदवारी न मागता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचासाराठी न्यू कॉलेजमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आग्रह केला जात आहे, त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, सक्ती करण्यात येत आहे , असा गंभीर आरोप महायुतीतर्फे करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर त्यांना काही फॉर्म्स देण्यात आले , ते फॉर्म्स त्यांनी 20 नातेवाईकांकडून भरून आणायचे आहेत. आणि हे भरलेले फॉर्म्स संस्थकडे जमा करण्याची सक्ती देखील केली असा आरोपही महायुतीने केला.
जाब विचारण्यासाठी न्यू कॉलेजमध्ये पदाधिकारी दाखल
या प्रकरणावरून महायुतीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून याचा जाब विचारण्यासाठी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी न्यू कॉलेजमधील प्रिन्सिपल व्ही. एन. पाटील यांची केबिन गाठली.
मात्र या सगळ्या प्रकरणात प्राचार्यांनी हात वर केल्यानंतर महायुतीचे हे सर्व पदाधिकारी न्यू कॉलेज संस्थेच्या चेअरमन यांच्या केबिनमध्ये आले. आणि शिक्षकांकडून, जे काही फॉर्म्स भरून घेतले आहेत, ते सर्व आमच्या ताब्यात द्या , त्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. या प्रकरणावरून कोल्हापुरातलं वातावरण खूप तापल्याचं दिसत आहे. यापुढे आता हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत’, संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलं आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूर्वगामी विचार जपला. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी संबंधित वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण तापू लागलं आहे.