कसे विचारावे प्रश्न ? नवीन आमदारांना पडला प्रश्न, ‘हा’ नेता म्हणाला आमच्यासोबत या तुम्हाला…
दोन वर्ष कोरोनामुळे वाया गेली. त्याचा परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावरही दिसून आला. विधिमंडळाचे अधिवेशन दोन ते एक आठवडे इतकेच मर्यादित राहत होते.
मुंबई : राज्यात २०१९ मध्ये विधानसभेची निवडणुक झाली. शिवसेना आणि भाजपने युती म्हणून ही निवडणूक लढविली. पण, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, उद्धव ठाकरे यांना सत्तेचा फार काळ लाभ घेता आला नाही. राज्यात कोरोनाचे वारे वाहू लागले आणि पहाता पहाता कोरोनाने राज्याला विळखा घातला. दोन वर्ष कोरोनामुळे वाया गेली. त्याचा परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावरही दिसून आला. विधिमंडळाचे अधिवेशन दोन ते एक आठवडे इतकेच मर्यादित राहत होते. कोरोना काळ संपून सर्व काही सुरळीत सुरु हात नाही तोच राज्यात सत्ताबदल झाला.
अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी मार्च २०२२ मध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यापाठोपाठ जून महिन्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूक झाल्या. विधान परिषद निवडणूक झाली आणि त्याच रात्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले. भाजपच्यासोबत जात त्यांनी राज्यात पुन्हा शिवसेना आणि भाजपचे सरकार आणले. मात्र, या सगळ्या राजकीय बदलाचा परिणाम नवीन आमदारांच्या कामकाजावर झाला.
कोरोनामुळे अडीच वर्ष या नवीन आमदारांना विधिमंडळात प्रश्न कसे उपस्थित करायचे हे समजूनच घेता आले नाही. विधिमंडळात विविध नियमांखाली अनेक चर्चा होत असतात. त्यासाठी किमान वेळ ठरवून दिला जातो. मात्र, या चर्चेतही पक्षाचे वरिष्ठ नेतेच जास्त वेळ बोलत असल्याने नवख्या आमदारांना एम मत मांडण्याची, आपल्या मतदारसंघातील प्रश्न विचारण्याची संधी अत्यंत कमी प्रमाणात मिळाली.
मुळात प्रश्न कसे उपस्थित करावेत याची माहितीच नसल्याचा परिणाम त्यांच्या परफॉर्मन्सवर होत आहे. विधानसभेत आक्रमकपणे आपले मुद्दे कसे मांडावेत अशी इच्छा सर्वपक्षीय नव्या आमदारांनी उद्धव ठाकरे गटाच्या एका नेत्याकडे व्यक्त केली. त्यावर त्या नेत्याने नवख्या आमदारांना प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली.
तुम्ही नवीन आमदार माझ्याकडे आलात. पण, त्याची कल्पना तुमच्या वरिष्ठाना द्या. काय आहे सध्या कोण कुणासोबत आहे हेच कळत नाही. त्यामुळे उद्या तुम्ही आमच्यासोबत आलात, माझ्याबरोबर दिसलात तर तुमच्यावरही बंडखोर, गद्दार म्हणून शिक्का बसेल. त्याची काळजी घ्या, असे सांगत ‘या’ ठाकरे गटाच्या नेत्याने नेमके वास्तव्यावर बोट ठेवले.