महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होईल : सरोज पांडे
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री कुणाचा असणार यावरुन भाजप-शिवसेनेत वाद सुरु आहे. आता या वादात भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी देखील उडी घेतली आहे.
नाशिक : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री कुणाचा असणार यावरुन भाजप-शिवसेनेत वाद सुरु आहे. आता या वादात भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी देखील उडी घेतली आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि पुन्हा देखील भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा सरोज पांडेंनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता तयार झाल्याची चर्चा आहे.
पांडे म्हणाल्या, “मी हे खूप स्पष्टपणे सांगत आहे की सध्या महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि यापुढेही असेल. आम्ही महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक लढवत आहोत. ही निवडणूक आम्ही युतीतच लढू, मात्र मुख्यमंत्री भाजपचाच बनेल हे निश्चित आहे.”
सध्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वातावरण दिसत असल्याचाही दावा सरोज पांडे यांनी केला. देशात भाजपच मजबूत पक्ष आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात खूप चांगले केले आहे. त्यामुळे लोकांच्या सेवेसाठी पुन्हा आमचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु.”
काँग्रसे पक्षाला आपले अस्तित्व शोधण्याची गरज
यावेळी बोलताना पांडे यांनी काँग्रेसवरही टीका केली. “लोकशाहीत मजबूत विरोधपक्ष असणे आवश्यक आहे. मात्र, यावेळी तसा मजबूत विरोधीपक्ष दिसत नाही. काँग्रसे पक्षाला आपले अस्तित्व शोधण्याची गरज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाची स्थिती राज्यातच नाही तर देशातही खराब आहे. त्यामुळे त्यांना ठरवावे लागेल की कुणाला नेता करायचे आणि कुणाला पुढे आणायाचे. त्यामुळे लोकशाहीत चांगला विरोधीपक्ष असावा यासाठी त्यांनी त्यांचा नेता शोधावा आणि लढावे, अशी त्यांना शुभेच्छा देईल”, असेही पांडे यांनी नमूद केले.