महाराष्ट्र गारठला ! यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद कुठे? द्राक्ष बागा संकटात
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे, गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढत चालला असून नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी सर्वाधिक कामी तापमानाची नोंद झाली आहे.
नाशिक : उत्तरेकडील राज्यातून थंड वारा वाहू लागल्याने राज्यातील तापमानाचा पारा घसरत चालला आहे. गेल्या आठवड्यापासून वातावरण झालेल्या बदलामुळे दिवसभर गारवा वातावरणात राहत आहे. राज्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. यामुळे प्रयटकांची मोठी गर्दी त्याठिकाणी असते. पण महाबळेश्वर पेक्षाही अधिकची थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवयाला मिळत आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडी आहे. यंदाच्या वर्षातील सर्वाधिक नीचांकी तापमानातची नोंदही निफाडमध्ये झाली आहे. निफाड येथील कुंडेवाडी संशोधन केंद्रात 5 अंश सेल्सिअस तर ओझर येथील केंद्रात 4.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमानात सध्यातरी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे. तापमानाचा पारा घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.
जसा-जसा तापमानाचा पारा घसरत जातो तशी अधिकची चिंता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची वाढत असून द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असते.
यंदाच्या वर्षी अनेकदा मुसळधार पाऊस आल्याने त्यातून द्राक्ष उत्पादक शेतकरी कसाबसा सावरला होता मात्र पुनः थंडीचे संकट उभे राहिले आहे.
यापेक्षाही तापमानाचा पारा घसरल्याने द्राक्ष बागा अडचणीत येऊ शकतात, त्यामुळे त्यातून बचावासाठी शेतकरी शेकोट्या पेटवून ऊब निर्माण करत आहे.
नाशिक शहरात मात्र या थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येत असतात, देवदर्शन आणि नाशिकच्या थंडीचा अनुभव घेणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ दिसून येत आहे.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते, त्यामुळे तिथे पर्यटकांची मोठी गर्दी असते पण गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिकची ओळख होऊ लागली असून पर्यटकांची पाऊले देखील वळू लागली आहे.