मुंबई : आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायमच चर्चेत असणारे कीर्तन(Kirtan)कार निवृत्तीमहाराज देशमुख (इंदोरीकर-Indurikar Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या कीर्तनातला एखादा भाग तरी चर्चेला आमंत्रण देत असतो. आता रावणदहनासंदर्भातलं त्यांचं कीर्तन व्हायरल (Viral) झालंय. चौकात रावण जाळणं (Ravan dahan) आपल्या बजेटमध्ये बसत नाही, का तर त्याचं स्पष्टीकरणही त्यांनी आपल्या कीर्तनात दिलंय.
‘श्रीमंत राजा रावण’
त्यांचं एक कीर्तनं सध्या व्हायरल होतंय. यात ते रावणदहनाच्या विरोधात आपली भूमिका मांडतायत. रावण जगातला पहिला मातृभक्त, शिवभक्त, मरतानाही हसणारा पहिला भक्त आणि रामासमोर देह ठेवणारा सर्वात श्रीमंत राजा रावण असं त्यांनी रावणाचं वर्णन केलं. आपल्याकडे चुकीच्या पोथ्या वाचून मतं तयार झालीत. रावणानं सीता पळवली, तुला काय तकलीफ झाली, तुही पाव्हणी व्हती का ती? असा सवाल त्यांनी कीर्तनातून केलाय.
‘उलट्या पोथ्या वाचणं बंद करा’
ते पुढे म्हणतात, रावणानं सीता पळवली हे सांगण्यापेक्षा त्यांनी आईसाठी आत्मलिंग आणलं हे सांगा ना. उलट्या पोथ्या वाचणं बंद करा, असं आवाहन त्यांनी केलंय. लंका सोन्याची होती, तरीही शंकराची भक्ती करायचा अन् आपल्याकडे ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळातही जात नाही येडं, असा समाचार त्यांनी घेतला.
‘आरं तुहा बाप पेटवं ना…’
सात-आठ पुढाऱ्यांनी एकत्र यायचं त्यांनी रावणदहन करायचं म्हणे पेटवा रावण. आरं तुहा बाप पेटवं ना. चालला रावण पेटवायला. रावण कोण आहे, हे तरी ध्यानात घ्याना आधी. अहंकार नावाचा रावण जाळा आणि दसरा साजरा करा, अशा खास शैलीत त्यांनी समाचार आपल्या कीर्तनातून घेतला. त्यांचं हे कीर्तन गावरान तडका या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. साडे बारा मिनिटांच्या या क्लिपमध्ये त्यांनी रावणदहनाच्या पारंपरिक कार्यक्रमावर टीका करत प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलाय. (व्हिडिओ सौजन्य – गावरान तडका)