हातकणंगले पंचायत समिती सभापतींच्याविरोधात अविश्वास ठराव, काय होणार?
निधीचा परस्पर वापर होत असल्याचा आरोप करत 22 पैकी 16 सदस्यांनी हातकणंगले पंचायत समिती सभापती महेश पाटील यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे.
हातकणंगले : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी पंचायत समितीचे सभापती महेश पाटील यांच्याविरूद्ध 16 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलाय. हा ठराव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मंजुरीसाठी आज (सोमवार) पाठविण्यात आला. निधीचा परस्पर वापर होत असल्याचा आरोप करत 22 पैकी 16 सदस्यांनी महेश पाटील यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केलाय. (No confidence motion against Hatkanangle Panchayat Samiti Chairman Mahesh Patil)
आमदार प्रकाश आवाडे यांच्या गटाचे सभापती पाटील हे ताराराणी आघाडीचे सदस्य असून त्यांच्याविरूद्ध भाजप 5, जनस्वराज्य 5 , शेकाप 3 , शिवसेना 2 आणि काँग्रेस 1 अशा 16 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे.
हातकणंगले तालुक्यातील चंदूर गावातील सभापती पाटील इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. पंचायत समितीसाठी येणाऱ्या निधीचा परस्पर वापर करत आहेत. तसेच स्वच्छ भारत अभियानातर्गंत बांधण्यात आलेल्या अडीच कोटी शौचालय घोटाळ्यात पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात 16 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलाय.
पंचायत समितीच्या इतिहासात सभापतीविरोधात अविश्वास ठराव दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे इचलकरंजीसह जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे हातकणंगले तालुक्यामध्ये सध्या चर्चेचा विषय बनला आहे
हातकणंगले तालुक्यातील पंचायत समितीत कोव्हिड काळात अडीच कोटीचा शौचालय घोटाळा झाला होता. याबाबत पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा यांनी लोकायुक्त मुंबई , विभागीय आयुक्त पुणे, जिल्हााधिकारी कोल्हापूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांचेकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल केली. परंतु यामध्ये पंचायत समिती सभापती आणि तत्कालिन गटविकास अधिकारी सामिल असल्याने राजकीय दबाव टाकून तक्रारदाराला त्रास देण्याचा उद्योग सुरु असल्याचा आरोप जनगोंडा यांनी केलाय.
दरम्यान, या प्रकरणाची जिल्हााधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, घोटाळ्यात अडकलेल्या अधिकारी, लोकप्रतिनिधींवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी असतानाही हा भ्रष्टाचार जिरवण्याचा उद्योग सुरु आहे. संबधितांवर तात्काळ चौकशी करुन कारवाई न झाल्यास, 11 तारखेला (शुक्रवार ) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या दालनासमोर अर्धनग्न आंदोलन आणि त्यानंतर दुपारी आत्मदहन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा यांनी दिला आहे. (No confidence motion against Hatkanangle Panchayat Samiti Chairman Mahesh Patil)
संबंधित बातम्या
इचलकरंजीत जर्मनी गँगच्या गुंडांचा दोघांवर जीवघेणा हल्ला, एकाची बोटे तुटली