तर फडणवीस यांना नमस्कार घालायलाही माणूस नसेल, कोण म्हणालं असं?
' पवार कुटुंब फोडू नये अस कार्यकर्त्यांना वाटत होत पण दादाला कसं नेल ही सगळ्यांना माहिती आहे. भाजपने मित्र पक्ष शिवसेनेला त्रास दिला आता अजित पवारांना काय करतील सांगता येत नाही, असं रवींंद्र धंगेकर म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या लढाईला आता चांगलीच रंगत आली असून पुण्यातही काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, अशा शब्दांत धंगेकर यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला.’
रवींद्र धंगेकर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. फडणवीसांवर टीका करतानाच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. आता पर्यंत अनेक मुख्यमंत्री आपण पाहिलेत, पण कोरोना काळात केलेलं श्रेय हे उद्धव ठाकरे यांना द्यावं लागेल असं ते म्हणाले.
अजित दादांना भाजपाने कसं नेलं सगळ्यांना माहीत आहे
सहा महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजपसोबत गेले. पक्षात उभी फूट पडली आणि पवार कुटुंबही फुटल्याने खळबळ उडाली. याचाच संदर्भ देत धंगेकरांनी केलेलं वक्तव्यही सध्या चर्चेत आहे. ‘ पवार कुटुंब फोडू नये अस कार्यकर्त्यांना वाटत होत पण दादाला कसं नेल ही सगळ्यांना माहिती आहे. भाजपने मित्र पक्ष शिवसेनेला त्रास दिला आता अजित पवारांना काय करतील सांगता येत नाही ‘ असेही धंगेकर म्हणाले.
देशासाठी राहुल गांधीची सभा
मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उद्या ( ३ मे) पुण्यात सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी हे पुण्यात येऊन गेल्यानंतर राहुल गांधी यांची पुण्यात सभा होणार आहे. ही सभा देशाच्या मुद्यावर होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी येत आहेत असे सांगत मोदींच्या सभेला उत्तर म्हणून ही सभा नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं.