Manoj Jarange Patil : तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगे पाटील यांचा थेट सरकारलाच इशारा
नोंदी रद्द करणं तुम्हाला पेलणार आहे का? मला फुसके दावे सांगू नका. वेळ प्रसंगी बलिदान देईल. पण मी मागे हटणार नाही. माझा समाज माझ्या मागे उभा आहे. मला पाठबळ आहे. माझा समाज एकत्र आला ही त्यांची पोटदुखी आहे. समाजाच्या एकीचं मतात रुपांतर झालं म्हणून त्यांना मला हटवायचं आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
आमच्या हक्काचं आरक्षण आहे. तेच आम्ही मागतोय. ओबीसी मात्र त्यांना आरक्षण असून अजून जास्त आरक्षण मागत आहेत. येवल्याच्या भुजबळांना सर्वच ओरबाडून घ्यायचं आहे. आमचं तसं नाही. आमच्या नोंदी आहेत. त्यामुळे आरक्षण आमच्या हक्काचं आहे. सरकार तसं करणार नाही. पण सरकारने तसं केलं तर सरकारलाच महागात पडेल. सरकारने पूर्वी सारखच केलं तर पुन्हा सरकारचे हाल होतील. आमचा नाईलाज आहे, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट सरकारलाच इशारा दिला आहे. आमची एकही नोंद खोटी नाही. तरीही जाणूनबुजून कारवाई केली जात आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्या खोट्या ठरवल्या जाणार आहेत. सरकार भुजबळांच्या बाजूने बोलून आमच्यावर कारवाई करत आहे. ओलं तुमचं आहे, तसं सुकं तुमचं आहे. सरकार तुमचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हम करे सो कायदा आहे का ?
मंडल आयोगाने 14 टक्के आरक्षण दिलं. 1984ला ज्या नेत्याने आरक्षण दिलं तेही रद्द करा. त्या नेत्यावर कारवाई करा. मंडल आयोगावर कारवाई करा. द्वेष आणि जातीयवाद तुम्हीच वाढवणार, आमच्यावर आरोप करता. तुम्हीच आरक्षण देता आणि तुम्हीच रद्द करता हा कुठला न्याय? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. आमच्या 57 लाख नोंदी सापडल्या. आता तुम्ही प्रमाणपत्र देत नाही. तुम्हीच खोड्या काढता. आम्ही विचारलं तर आम्ही जातीयवादी का? हम करे सो कायदा आहे का? असा सवाल त्यांनी केला.
त्यांना भांडणं लावायचीय
ओबीसी उपोषणकर्ते माझे लोक आहेत, असं भुजबळ म्हणाले. माझे फंटर आहेत, असंही भुजबळ म्हणत होते. याचा अर्थ त्यांना बोलून काय उपयोग आहे? भुजबळांना ओबीसी आणि मराठ्यात भांडणं लावायचे आहेत. धनगर आणि मराठ्यात भांडण लावत आहेत. त्यांना भांडण लावून घरात बसायचं आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
तायवाडे भाऊ, तुम्ही…
यावेळी त्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनाही विनंती केली. तायवाडे भाऊ, तुमच्या स्टेजवर काय घडलं? तुम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचला. आयाबहिणींवर टीका केली. तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही सर्वांना समान वागवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या स्टेजवरील नेत्यांची भाषणं काढून पाहा. तायवाडे भाऊ दिल्या की नाही शिव्या? तुम्ही दोन्ही समाजाला समजवायला हवं होतं. किमान तुम्ही तरी मराठा द्वेष ठेवू नका. सत्य बोला. तुम्ही सर्वांचे बनून राहा. तुम्ही शिव्या दिल्या नाही. पण तुमच्या समोर इतर नेत्यांनी दिल्या हे तरी मान्य करा, असं आवाहन त्यांनी केलं.