मंत्री छगन भुजबळ यांना सलग बारा मेसेज पाठवून धमकी

| Updated on: Dec 01, 2023 | 10:16 AM

maratha reservation and obc leader chhagan bhujbal | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांना धमकीचे मेसेज आले आहे. एकामागे एक सलग बारा मेसेज पाठवून त्यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांना सलग बारा मेसेज पाठवून धमकी
Follow us on

दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर, 1 डिसेंबर 2023 | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचे मेसेज आले आहेत. एकामागे एक सलग बारा मेसेज पाठवून त्यांना धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर सारखे कॉल येत होते. परंतु भुजबळ यांनी कॉल घेतले नाही. यामुळे त्यांना धमक्यांचे सलग बारा मेसेज करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणाच्या मोबाईलवरुन आले फोन

मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. मराठा समाजास वेगळे आरक्षण देण्यास आपला विरोध नसल्याचे ते सांगत आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी ते ओबीसी समाजाच्या सभा घेत आहेत. राज्यात एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या दौराचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. भुजबळ यांनीही दोन सभा राज्यात घेतल्या आहेत. त्या सभेतून ते मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे भुजबळ यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या मिळत आहे. त्यांच्या दौऱ्यांना विरोध होत आहे. छत्रपती संभाजीनगरात अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आले असताना त्यांना धमक्यांचे मेसजे आले. सौदागर सातनाक नामक व्यक्तीच्या क्रमांकावरून धमकी आल्याचा तक्रार पोलिसांत दिली आहे.

गुन्हा दाखल, चौकशी सुरु

भुजबळ यांना धमक्यांचे फोन आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरातून भुजबळ यांना धमकी आल्याची ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. तसेच राज्य सरकारकडून छगन भुजबळ यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी फोन करणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे.