ब्रिटिशकालीन दीडशे वर्षांपूर्वीचे ‘सील’ यंत्र, आजही होतेय दसऱ्यानिमित्त यंत्राची पूजा, कुठे आहे हे यंत्र?
महापालिकेकडून त्या कामांवर जी मोहोर उमटवली जाते ते यंत्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. महापालिका अस्तित्वात आली तेव्हापासूनचे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज सचिव विभागाने आजही जपून ठेवलेत. यात सन १८७३ मध्ये झालेली पहिल्या सभेचे इतिवृत्त ते आतापर्यंत घेतलेले महत्वाचे निर्णय यांचा समावेश आहे.
मुंबई | 23 ऑक्टोंबर 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी एक आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. ब्रिटिशकाळात या इमारतीची बांधणी झाली. दीडशे वर्ष झाली तरी या इमारतीचे सौंदर्य अजूनही अबाधित आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी तसेच विविध सण, उत्सव यावेळी या इमारतीला होणारी आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडालेली असते. याच इमारतीमध्ये अनेक कुतूहल वाढविणाऱ्या वस्तूंचे आजही जतन केले जातेय. यातीलच एक म्हणजे ब्रिटिशकालीन दीडशे वर्षांपूर्वीचे ‘सील’ यंत्र.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सचिव विभागात हे ब्रिटिशकालीन ‘सील’ यंत्र ठेवण्यात आलेय. विशेष म्हणजे हे सील यंत्र आजही कार्यरत आहेत. अनेक ऐतिहासिक आणि महत्वाच्या कागदपत्रांवर महापालिकेचा ‘सील’ उमटवण्याचे काम हे सील अजूनही अव्याहतपणे करतंय. दरवर्षी दसऱ्याला या सील यंत्राची पूजा करून महापालिकेतील कर्मचारी त्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात.
मुंबई महापालिकेचे आर्थिक बजेट हे ५४ हजार कोटी रुपयांचे आहे. एका छोट्या राज्याच्या जितका आर्थिक बजेट नसेल त्यापेक्षा दुप्पट बजेट मुंबई महापालिकेचा आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती असाव्या या साठी प्रत्यके पक्ष धडपडत असतो. पालिकेतर्फे काढण्यात येणारी विकासकामे, निविदा, कागदोपत्री कामकाज यावर सर्वांची नजर असते. पालिका सभागृह, स्थायी समिती, विविध समित्या ती ती कामे, निविदा मंजूर करतात. पण, त्यावर जोपर्यंत पालिकेची मुख्य मोहोर उमटत नाही तोपर्यंत ही कामे अंतिम मानली जात नाहीत.
ब्रिटिशकालीन हे ‘सील’ यंत्र अतिशय भक्कम आणि पूर्णपणे लोखंडी बनावटीचे आहे. सन १८७४ मध्ये ते लंडन येथे तयार केले. एका मोठ्या लाकडी टेबलावर हे यंत्र बसविले आहे. एका मोठ्या लोखंडी तुळईच्या सहाय्याने ते वापरण्यात येते. तुळईच्या दोन्ही बाजूला लोखंडाचे दोन मोठे गोळे जोडले आहेत. यंत्राच्या खालच्या भागात छोटी लोखंडी फट आहे. त्यामध्येच ही मोहोर आहे. मोहोरवर महत्वाचा कागद ठेवून लोखंडी तुळई उजवीकडून डावीकडे फिरवली जाते. कागद खाली जाऊन त्यावर क्ख्लाई लोखंडी फटीचे दोन्ही लोखंडी भाग एकमेकांवर दाबले जातात आणि कागदावर ठसठशीत मोहोर उमटते! विशेष बाब अजूनही हे यंत्र आहे उत्तम परिस्थितीत काम करत आहे. दरवर्षी दसऱ्याला या यंत्राचे पूजन केले जाते.