मालेगाव : मतासाठी शिवसेना एमआयएमच्या दारी; कृषीमंत्री भुसे यांनी घेतली मौलाना मुफ्तींची भेट
मत फिरविण्यासाठी विरोधक एकमेकांच्या मते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतांना राज्यात एमआयएमचे केवळ दोनच आमदार आहेत. यापैकी मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहमद ईस्माइल हे एक आहेत. मौलाना यांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान करावे, यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली.

मालेगाव : राज्यातील 6 खासदारांचा हा कार्यकाळ असून येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. भाजपकडून पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कॉंग्रेसकडून इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची घोषणा झाली आहे. यावेळी आमदारांचे बलाबल पाहता भाजपचे दोन आणि शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र आपल्या पक्षाचे सर्व खासदार निवडणून यावेत यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असली आहे. तर भाजप आणि शिवसेनेने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे मतासाठी शिवसेना राज्यातील अपक्ष आमदारांसह (Independent MLA) छोट्या छोट्या पक्षांकडे जात आहे. त्यांच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहे. तर राज्यसभेच्या निवडणूकीवरून कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी नुकतीच मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल (Maulana Mufti Mohammad Ismail) यांची भेट घेतली. त्यावरून आता विरोधक शिवसेनेवर टीका करताना दिसत आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच
राज्यातील विकास महात्मे, पियूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, प्रफुल पटेल आणि पी चिदंबरम यांचा कार्यकाळ संपला आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपलेल्या संभाजीराजे छत्रपती यांचाही कार्यकाल संपला होता. पण मध्यंतरी त्यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले होते. मात्र राजकीय पक्षात सामिल न झाल्याने त्यांना खासदारकीच्या या निवडणूकीतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेत यावरून जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नसल्याने या दोघांची भिस्त छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आहे. त्यामुळे ही निर्णायक मते आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.




पक्षश्रेष्टींचा आदेश आला नाही
राज्यसभेच्या निवडणूकीत प्रथमच छोटे पक्ष आणि अपक्षांना महत्त्व आले आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. आपल्या पारड्यात अधिकाधिक मते मिळावीत यासाठी प्रत्येक उमेदवार, नेते जंगजंग करत आहेत. तर मत फिरविण्यासाठी विरोधक एकमेकांच्या मते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतांना राज्यात एमआयएमचे केवळ दोनच आमदार आहेत. यापैकी मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहमद ईस्माइल हे एक आहेत. मौलाना यांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान करावे, यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली. दरम्यान पक्षक्षेष्टींचा निर्णय मान्य असणार असून अजून पक्षश्रेष्टींचा आदेश आला नसल्याचे मौलाना मुफ्ती यांनी सांगितले.