मुंबई- शिवसेनेशी बंडखोरी (Rebel Shivsena MLA)केलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. ५५ पैकी ४० हून अधिक आमदार गुवाहाटीत असल्याची माहिती आहे. अशा स्थितीत शिवसेनेचा वेगळा गट स्थापन व्हावा, याच प्रयत्नात एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आहेत. अगदीच तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांना त्यांचा पक्ष दुसऱ्या पक्षात विलिन करावा लागेल. 16 आमदारांच्या निलंबनाची शक्यता दिसते आहे. सोमवारपर्यंत त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांना उत्तर दिले नाही तर त्यांचे निलंबन होईल असे मानण्यात येते आहे. असे झाल्यास पक्षात दोन तृतियांश फूट दाखवणे अवघड होण्याची तसेच विश्वासदर्शक ठरावातही अडचण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांच्यासमोर भाजपात जाणे हा पर्याय आहे. किंवा अगदीच पर्याय नसेल तर प्रहार जनशक्ती या पक्षातही ते जाऊ शकतात. मात्र तिथे उपस्थित असलेले बंडखोर असा कोणताही निर्णय घेण्यास तयार नसण्याची शक्यता आहे. शिवसेना या नावासोबत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सोडण्य़ाची त्यांची तयारी नसणार आहे. काय आहेत याची पाच कारणे (five reasons)जाणून घेऊयात.
गद्दार अशी ओळख निर्माण करण्याची एकनाथ शिंदेंसह कुणाचीही तयारी नसल्याची माहिती आहे. नारायण राणे आणि छगन भुजबळांच्या बंडानंतर, त्यांची अवहेलना शिवसेनेत गद्दार अशी करण्यात आली. शिवसेनाप्रनमुख बाळासाहेब ठाकरे आणि इतर नेतेही त्यांच्यावर खालच्या शब्दांत टीका करीत, हा गद्दारीचा टॅग आपल्या नावापुढे येऊ नये, आपलाच बंडखोरांचा वेगळा गट हा शिवसेना म्हणून मान्य व्हावा, अशीच सगळ्यांची इच्छा आहे.
भाजपात गेले तर भाजपाची कामाची पद्धती आणि शिवसेनेची कार्यपद्धती यात बराच फरक आहे. भाजपात सध्या राज्यातील अनेक काँग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बरही आलेले आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी आलेल्या या नेत्यांविरोधात स्थानिक पातळीवर अनेक आत्ताच्या बंडखोर नेत्यांचे बिनसलेले आहे. अशा स्थितीत ते त्यांच्यासोबत पक्षात आल्यास नवे वाद सुरु होण्याची शक्यता आहे. भाजपात पक्षश्रेष्ठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीशिवाय फार काही करता येणार नाही, हेही या आमदारांना माहित आहे. त्यामुळे भाजपासोबत जाण्याची त्यांची मानसिकता नाही.
शिवसेनेतूनच यातील अनेक नेते मोठे झालेले आहेत. त्यामुळे आता जर दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यासोबत फुटलेल्या आमदारांना पुढील निवडणूक जिंकून येणे अवघड होऊ शकते. तसेच त्यांचा सध्याचा जनाधारही संपण्य़ाची शक्यता आहे. त्यामुळेही शिवसेना सोडण्याची त्यांची तयारी नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आणि कुटुंबीयांशी यातील अनेक बंडखोरांचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाणे म्हणजे थेट प्रतारणा ठरेल. ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवर आणि सार्वजनिक पातळीवरही परवडणारे नाही. यातील अनेकांना शिवसेनाप्रमुखांनी तिकिटे दिल्यानेच ते आमदार झाले, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळे शिवसेना आणि बाळासाहेब यांचे नाव सोडण्याची त्यांची तयारी दिसत नाही.
राजकीय तोटाही होण्याची शक्यता जास्त मोठी आहे. भाजपात गेल्यानंतर, तिथल्या प्रस्थापित नेतृत्वाशी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच भाजपात गेल्यास या बंडखोरांची बार्गेनिंग पॉवर संपेल असेही सांगण्यात येते आहे. वेगळा गट असल्यामुळे सातत्याने भाजपावर दबाव ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे भाजपात गेल्यास ही पॉवर गमावण्याचीही या गटाची तयारी नसल्याचे सांगण्यात येते आहे.