टक्केवारी सरकार, चोर सरकार, विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला; उद्धव ठाकरे येताच पेढे वाटप
राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. येत्या तीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर प्रचंड गोंधळ घातला. जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर प्रचंड गोंधळ घातला. टक्केवारी सरकार, चोर सरकार अशा घोषणा देत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर गोंधळ घालून अधिवेशनात सरकारला कसं आणि किती धारेवर धरलं जाईल याचे संकेतच दिले आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘ शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या धिक्कार असो’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी अनिल देशमुख आणि भाई जगतापही उपस्थित होते.
वीज बिल माफ करा
शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी, कोरडा डोळा कोरडी विहीर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोण देणार धीर, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत टक्केवारी सरकार हाय हाय, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे.अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे. शेतकऱ्यांना अनुदान दिलं नाही, कर्ज मुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी यावेळी केली.
विरोधकांच्या घोषणा काय?
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच बळीराजाचा बळी जात आहे. मंत्री सुखी, शेतकरी दु:खी, टक्केवारी सरकार, चोर सरकार आणि 40 टक्के सरकार हाय हाय… अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या. त्यामुळे संपूर्ण विधानभवन परिसर दणाणून गेला.
उद्धव ठाकरे येताच पेढे वाटप
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज विधानभवनात आले. उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात येताच विरोधकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. अंबादास दानवे आणि शिवसैनिकांनी पेढे वाटप केलं. उद्धव ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे विरोधकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.