कुणाल जयकर, शिर्डी, अहमदनगर | 8 नोव्हेंबर 2023 : यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. राज्यातील अनेक प्रकल्प भरले नाही. यामुळे पुढील वर्षी जुलै महिन्यांपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. धरणातील पाण्यासाठी पहिले आरक्षण पिण्यासाठी पाण्याचे आहे. त्यानंतर शेतीसाठी पाणी देण्यात येणार आहे. यंदा खरीप हंगाम समाधानकारक झाला नाही. यामुळे रब्बी हंगामासाठी धरणातून पाणी मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु राज्यातील दोन जिल्ह्यात पाण्यावरुन वाद सुरु झाला आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पाणी छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी प्रकल्पात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या सणासुदीत पाणीप्रश्न पेटणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास राजकीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत नगर आणि नाशिकमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचा आदेश देण्यात आलाय. जवळपास साडेआठ टिएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. परंतु या निर्णयास नाशिक आणि नगर जिल्ह्यातून विरोध होत आहे. जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडले तर नगर नाशिकमधील शेतकरी संकटात सापडणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी म्हटले आहे.
अहमदनगरमधील निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागात सोडलेले पाणी अद्याप अनेक गावात पोहचलेच नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी संतप्त झालेले आहे. त्याचवेळी जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जायकवाडीला पाणी सोडणार असल्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत बैठक घेतली. या बैठकीत नगरमधील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला.
समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 साली झालेला आहे. हा कायदा म्हणजे काळा कायदा आहे. नगर नाशिकवर यामुळे अन्याय होत आहे. दोन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून यासाठी लढा देण्याची गरज असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्यात वळवण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.