Kalyan Corona : केडीएमसीचे कृषि उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ बाजार बंद करण्याचे आदेश
बाजार समितीप्रमाणोच कल्याण स्टेशन परिसरात लक्ष्मी भाजीपाला मार्केट आहे. या मार्केटमध्ये ओट्यावर व्यापार करणारे व्यापारी आहेत. त्यांनी एक दिवसाआड ओट्यावर व्यापार करावा, अशा सूचना व्यापारीवर्गाला देण्यात आल्या आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापलिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना स्प्रेडर ठरणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ बाजार बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. व्यापाऱ्यांनी किरकोळ बाजार बंद करावा, असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहेत. आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
पालिका आयुक्तांनी जारी केल्या नव्या सूचना
किरकोळ बाजार बंद करीत असताना घाऊक व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असावेत. त्यांनाच बाजार समितीत प्रवेश दिला जावा. तसेच लसीचे दोन डोस घेण्याची सक्ती केली जावी, अन्यथा त्यांना बाजार समितीत प्रवेश दिला जाऊ नये. बाजार समितीत राज्यातील विविध जिल्हे आणि राज्याबाहेर शेतमाल घेऊन येणारी वाहने शेकडोच्या संख्येत असतात. त्यांच्यावर नियंत्रण आणणे ही बाजार समिती प्रशासनाची जबाबदारी आहे. तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत, असे पालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.
आठवडी बाजार भरवल्यास दंड
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ शेतमाल वाहणाऱ्या 50 वाहनांना बाजार समितीत प्रवेश दिला जात होता. बाजार समितीप्रमाणोच कल्याण स्टेशन परिसरात लक्ष्मी भाजीपाला मार्केट आहे. या मार्केटमध्ये ओट्यावर व्यापार करणारे व्यापारी आहेत. त्यांनी एक दिवसाआड ओट्यावर व्यापार करावा, अशा सूचना व्यापारीवर्गाला देण्यात आल्या आहे. तसेच शहरातील सर्व ठिकाणचे आठवडी बाजार रद्द केले आहेत. आठवडी बाजार भरवल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. मॉल व मार्केटमधील व्यापाऱ्यांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
तूर्तास सोसायट्या सील केल्या जाणार नाहीत
कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, त्या सोसायटय़ा तूर्तास तरी सील केल्या जाणार नाही. जर 25 टक्के नागरीक पॉझीटीव्ह आढळले, तर त्या सोसायटीतील नागरीकांनी कोरोनाची अँटीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी. सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे. ज्या सोसायट्या नियम पाळणार नाहीत, त्या सोसायट्यांना पहिल्या वेळेस पाच हजार आणि दुसऱ्या वेळेस दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
रुग्ण आढळणाऱ्या सोसायटीत घरकाम करणाऱ्यांना प्रवेशबंदी
ज्या सोसायटीतील नागरीक कोरोना पॉझीटीव्ह आले, त्या सोसायटीत नोकर, घरकाम करणाऱ्या महिलांना प्रवेश दिला जाऊ नये. नोकर आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे लसीकरण झाले आहे, याची खात्री करूनच त्यांना प्रवेश देण्याची जबाबदारी सोसायटी व्यवस्थापनाची असेल. महापालिकेच्या पाहणीत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. काही नागरीक अॅमेझॉनवरुन कोरोना कीट मागवून सेल्फ किटद्वारे कोरोना चाचणी करतात. त्यांनी त्याची नोंद अॅपवर केली पाहिजे, असेही आयुक्तांनी नमूद केले.
तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 75 कर्मचारी बाधित
कोरोना लढ्यात 17 कर्मचारी दगावले असून माजी महापौरांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 75 कर्मचारी कोरोनाबाधीत आढळले आहेत. कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून या महामारीचा सामना करताहेत. अशा परिस्थिती कुणीही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणारे वक्तव्य करू नये, असे आवाहन पालिका आयुक्त सुर्यवंशी यांनी नाव न घेता मनसे आमदार राजू पाटील व टीका करणाऱ्याना केले. कोरोनाविरोधातील युद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांच्या चुका झाल्यास त्याबाबत सूचना अवश्य करा. पालिकेचे ७५० कर्मचारी सज्ज आहेत, असेही आयुक्त म्हणाले. (Order to close retail market in KDMC’s Agricultural Produce Market Committee)
इतर बातम्या
Kalyan: कल्याणमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
CCTV | रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण