Osmanabad | सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग जाम ,संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको, ईट ते गिरवली रस्त्यावर आंदोलन
या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात लहान - मोठे अपघात होत आहेत . रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली असतानाही मागील तीन वर्षांपासून मजबुतीकरणाचे नाव घेतलेले नाही .
उस्मानाबादः ईट ते गिरवली रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी सोलापूर औरंगाबाद (Solapur Aurangabad high way) राष्ट्रीय महामार्ग जाम केला आहे. संतप्त गावकऱ्यांनी रस्ता रोको (Rasta Roko) केला असून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. उपमुख्य मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निधी देऊन देखील काम निकृष्ट होते असल्याने गावकरी संतप्त आहेत. संतप्त गावकऱ्यांनी रस्ता रोको सुरू केल्याने प्रशासनाची धावपळ झाली. निकृष्ट काम करणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ही मागणी केली आहे. या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने नागरिक संतप्त आहेत.हा रस्ता उच्च प्रतीचा सिमेंट काँक्रीटचा करण्यात यावा, अन्यथा उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्या कार्यालयासमोर सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन उपोषणास बसण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
भूम तालुक्यातील ईट ते गिरवली फाटा हा औरंगाबाद सोलापूर महामार्गाला जोडणारा रस्ता आहे त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक असते . सध्या याच मार्गावरून ऊसाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अगोदरच खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या या रस्त्यावर आता काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत खड्डे पडले आहेत. विकासाची स्वप्नं दाखविलेले लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र ग्रामस्थांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहायला तयार नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा ईट ते गिरवली फाटा हा 10 ते 11 किलोमीटर अंतराचा प्रमुख जिल्हा मार्ग आहे या मार्गाची ऊस वाहतुकीला सुरुवात होण्यापूर्वीच अक्षरशः चाळण झाली होती असे असतानाच आता या खड्डेमय रस्त्यावरून भीमाशंकर शुगर चौसाळा , भैरवनाथ शुगर , वाशी धाराशिव साखर कारखाना , चोराखळी शंभू महादेव शुगर , सावरगाव या कारखान्यांसाठी ऊस वाहून नेणारी वाहने मोठ्या संख्येने धावत आहेत . त्यामुळे हा रस्ता आणखी धोकादायक बनला आहे .
खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ
त्यावर चक्क गुडघ्यापर्यंत लहान खड्डे पडले आहेत . या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात लहान – मोठे अपघात होत आहेत . रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली असतानाही मागील तीन वर्षांपासून मजबुतीकरणाचे नाव घेतलेले नाही . तीन वर्षांच्या कालावधीत केवळ दोनवेळा रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली मात्र , ही मलमपट्टीही फार काळ टिकली नाही . जैसे थे झाले त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे .