शिवकालीन दागिन्यांनी सजणार आई तुळजाभवानी, दिवाळीत दर्शनासाठी ‘हा’ विशेष बदल!
दिवाळीच्या पाच दिवसानंतर 31 डिसेंबरपर्यंत मंगळवारी, शुक्रवारी व रविवारी या गर्दीच्या दिवशी 22 तास खुले राहणार आहे.
संतोष जाधव, उस्मानाबादः महाराष्ट्राची कलस्वामिनी आई तुळजाभवानी (Tuljabhavani) मातेचं उस्मानाबाद (Osmanabad) येथील मंदिर दीपोत्सवासाठी सज्ज झालंय. दिवाळीत यंदा हे मंदिर 22 तास खुले राहणार आहे. पहाटे 1 वाजेपासून मंदिर खुले होणार असून रात्री 11 वाजता बंद होईल. विशेष म्हणजे दिवाळी पाडव्यानिमित्त (Diwali Padwa) शिवकालीन दागिने असलेले विशेष अलंकार देवीला घातले जातील.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी तुळजा भवानीच्या मंदिरात भेंडोळी उत्सावाचा थरार रंगणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली आहे.
24 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्थी दिवशी सोमवारी पहाटे देवीला अभ्यंग स्नान घालण्यात येईल. यावर्षी दिवाळीत सूर्यग्रहण असल्याने धार्मिक विधीत काही बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी 4.49 ते सायंकाळी 6.30 या वेळेत सोवळ्यात म्हणजे पांढऱ्या शुभ्र वस्त्रात ठेवली जाणार आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शारदीय व शाकंबरी नवरात्र उत्सवासह गुढीपाडवा, रंगपंचमी, बैलपोळा, नागपंचमी हे धार्मिक सण साजरे केले जातात. दिवाळी सणात यावर्षी नरक चतुर्थी व अमावस्या हे एकाच दिवशी आल्याने 24 सप्टेंबर रोजी सोमवारी पहाटे तुळजाभवानी देवीला अभ्यंगस्नान घालण्यात येणार आहे.
दिवाळीत मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण आहे. दुपारी 4.49 ते सायंकाळी 6.30 या वेळेत सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळे या काळात देवीच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. दुपारी 4.30 वाजता पूजेची घाट, 4.49 ते 6.30 या वेळेत देवीच्या मुळ अष्टभुजा मूर्तीला पांढऱ्या शुभ्र वास्त्रात सोवळयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.30 ते 8.30 या काळात अभिषेक पूजा होणार आहेत.
बुधवारी पाडव्याला देवीला शिवकालीन दागिने घातले जातील. विशेष अलंकार पूजा करण्यात येईल. तसेच पाडवा वाचन करण्यात येणार आहे. रात्री छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी देवीचे महंत, पुजारी व भक्त उपस्थित राहतील.
तुळजाभवानी मंदिर दिवाळीचे एकूण 5 दिवस व त्यानंतर नाताळ 31 डिसेंबर पर्यंत जास्त काळ सुरु राहिल. दिवाळीच्या पाच दिवसानंतर 31 डिसेंबरपर्यंत मंगळवारी, शुक्रवारी व रविवारी या गर्दीच्या दिवशी 22 तास खुले राहणार आहे.