तळीयेमध्ये 25 वर्षांच्या आतील 27 जणांचा मृत्यू, 11 मुलींचा समावेश, नातेवाईक हळहळले
महाड तालुक्यातील तळीये (Taliye landslide) गावात दरड कोसळून 53 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण बेपत्ता आहेत. तळीये गावातील मृतांमध्ये बहुसंख्य हे तरुण आणि तरूणींचा समावेश आहे. 25 वयोगटाच्या आतील 27 जणांचा ढिगाऱ्याखाली मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
रायगड : महाड तालुक्यातील तळीये (Taliye landslide) गावात दरड कोसळून 53 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण बेपत्ता आहेत. 22 जुलैला घडलेली ही घटना 23 जुलैला समोर आली होती. घटनेच्या पाच दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे. बचाव पथकाला 53 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर 32 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत.
तळीये गावातील मृतांमध्ये बहुसंख्य हे तरुण आणि तरूणींचा समावेश आहे. 25 वयोगटाच्या आतील 27 जणांचा ढिगाऱ्याखाली मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 11 मुलींचा समावेश आहे. या सगळ्या तरुणांचे गेल्यावर्षीचे दहीहंडी खेळतानाचे व्हिडीओही आता समोर आले आहेत. याशिवाय या मुलींचा गेल्या वर्षी गरबा खेळतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. हे व्हिडीओ पाहून आता या गावातील उरलेले नागरिक आणि त्यांचे नातेवाईक हंबरडा फोडत आहेत. आता केवळ आठवणी उरल्या असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रेस्क्यू ऑपरेशन थांबलं
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तळीये गावात सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन चार दिवसांपूर्वी थांबवण्यात आलं. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला.
सर्वांना मृत घोषित करा
आम्ही या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 84 नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता फक्त सरकारने सर्वांना मृत घोषित करून मदत करावी आणि आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, असं आवाहन तळीयेचे सरपंच संपत तांदळेकर यांनी केलं आहे.
तळीये दरड कोसळल्यामुळे 32 ते 35 घर जमीनदोस्त झाली. यामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला. डोंगर थेट घरावर कोसळल्यामुळे उताराच्या दिशेने सर्व वाहून गेले. यामध्ये काही मृतदेहही खाली वाहून गेले. त्याचा शोध NDRF च्या जवानांनी घेतला.
तळीयेमध्ये दरड कोसळली
22 जुलैला गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली होती.
संबंधित बातम्या
Taliye Death name List : अखेर पाच दिवसानंतर तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबलं, मृतांची संपूर्ण यादी
Raigad | Mahad | Taliye | अखेर तळीये दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबलं, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती