कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका, या जिल्ह्यात पाच बाजार समित्यांसाठी अशी होणार लढत
राज्यभर बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांवर राजकीय पक्षांनी लक्ष्य केंद्रित केलंय. स्थानिक पातळीवर या निवडणुका लढल्या जातात.
गडचिरोली : राज्यात बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक पातळीवर गटबंधन केले जाते. या बाजार समितीत्या आपल्या ताब्यात असाव्या, असे राजकीन नेतृत्वाला वाटते. त्यामुळे दृष्टिकोनातून या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, अहेरी या चार बाजार समित्यांमध्ये 29 एप्रिलला मतदान आणि मतमोजणी आहे. सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 एप्रिल रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. गडचिरोली ८१, चामोर्शी ६६, आरमोरी ३८, अहेरी ४५ आणि सिरोंचा ५० याप्रमाणे 280 अर्ज उमेदवारांनी दाखल केले.
येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि आरमोरी या भागात भाजप-शिंदे गटाची सोबत आहे. तर विरोधात काँग्रेस आणि शिवसेनेची लढत यावेळी दिसणार आहे. चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा या भागात राष्ट्रवादीचा गड असल्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत यावेळी वेगवेगळ्या गटातून दिसणार आहे.
मागील कार्यकाळाचे चित्र काय?
मागील कार्यकाळात गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस तर आरमोरीत भाजप, चामोर्शीत अपक्ष असलेले अतुल गण्यारपुवार मैदानात जिंकले होते. अहेरी येथे राष्ट्रवादी पक्षाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी गड राखून राष्ट्रवादीचा झेंडा कृषी उत्पन्न बाजार समितीत फडकविला.
आपआपला बालेकिल्ला सांभाळण्याचा प्रयत्न
सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती अपक्ष व्यंकटेश्वर वेनगंटीवार तर उपसभापती सतीश गंजीवार यांनी बाजी मारली होती. आता या ठिकाणी धर्मरावबाबा आत्राम आणि भंडारी कुटुंब आपला बालेकिल्ला सांभाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्याच्या सहकारी संस्था आणि थेट शेतकऱ्यांसोबत संबंध असल्यामुळे आपापले बालेकिल्ले सांभाळण्यासाठी राजकीय नेते नवनवीन रणधुमाळीचे राजकारण करताना दिसत आहेत.
बीआरएसची भूमिका काय?
गडचिरोलीच्या राजकारणामध्ये नवा पक्ष म्हणून बीआरएस पक्षाची सुरुवात करण्यात आली. पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपला ध्वज एका बाजार समितीवर फडकवणार का असा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना जनतेला पडलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पुढे जिल्हा परिषद निवडणूक असल्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.