तळहाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, वीज पडून 350 क्विंटल कांद्याचा कोळसा, शेतकऱ्याला अश्रू अनावर
राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र, मान्सून दाखल झाल्याच्या सुरुवातीलाच एक वाईट घटना घडली आहे (350 quintals of onions burnt due to Lightning strikes the ground)
धुळे : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र, मान्सून दाखल झाल्याच्या सुरुवातीलाच एक वाईट घटना घडली आहे. धुळ्यात बुरझड येथे मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शेतात विज कोसळल्याने एका शेतकऱ्याच्या कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत जवळपास 300 क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे. त्यामुळे बुरझडच्या शेतकऱ्याच्या तोंडाला आलेला घास नियतीने हिसकावून घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय (350 quintals of onions burnt due to Lightning strikes the ground).
अचानक शेतात वीज कोसळली
धुळ्यात बुरझड येथे रविवारी (6 जून) सकाळी साडे दहा ते अकराच्या सुमारास ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु होता. यावेळी वादळी वाराही वाहत होता. यावेळी अचानक बुरझडचे शेतकरी शरद उत्तम पाटील यांच्या शेतात वीज कोसळली. शरद पाटील यांचं शेत हे रस्त्याच्या अगदी कडेलाच आहे. शरद यांनी शेतात कांद्याचा साठा करुन ठेवला होता. वीज नेमकी कांदा चाळीवरच कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शरद पाटील यांच्या जवळपास 300 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले.
सरकारने भरपाई द्यावी, शेतकऱ्याची मागणी
या घटनेमुळे शरद पाटील खूप नाराज झाले आहेत. बुरझड गावात देखील या घटनेप्रती हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता शरद पाटील यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून मदतीची आशा आहे. सरकार आणि प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती शेतकरी शरद पाटील यांनी केली आहे (350 quintals of onions burnt due to Lightning strikes the ground).
अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
शेतात वीज कोसळल्यानंतर जवळपास दीड तास मुसळधार पाऊस पडला. एकीकडे वीज कोसळली दुसरीकडे पावसानेही झोडपून काढले त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या घटनेची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली. पंचायत समिती सभापती विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तलाठी अनिता भामरे, युवा नेते संदिप पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील बोरसे हे देखील होते. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी शेतकरी शरद पाटील यांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा : उद्धव ठाकरे मोदींना भेटणार तर मराठा आरक्षणाचा मार्ग खरंच मोकळा होणार?; वाचा सविस्तर