जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही, क्षणभरात काळाचा घाला; एकाच कुटुंबातील चौघांसह पाचजण दगावले
सांगलीच्या जत तालुक्यात काल रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.

सांगली : राज्यातील अपघाताची मालिका काही संपताना दिसत नाहीये. राज्यात रोज कुठे ना कुठे अपघात होताना दिसत आहे. काल रात्रीही सांगलीच्या जत तालुक्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोनन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. स्विप्ट कारने उभ्या डंपरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
सांगलीच्या जतच्या विजापूर-गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांसह पाचजण जागीच ठार झाले आहेत. रात्री हा अपघात झाला. गाणगापूरला दत्ताचे दर्शन घेऊन विजयपूर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात झाला. अपघात प्रचंड भीषण होता. या अपघातात स्विप्ट कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.



मृतांची नावे
या अपघातात चालक दत्ता हरीबा चव्हाण वय 40 याचा मृत्यू झाला आहे. चव्हाण हे जत येथे राहतात. नामदेव पुनाप्पा सावंत 65, पदमिनी नामदेव सावंत 60, श्लोक आकाशदीप सावंत वय 8, मयुरी आकाशदीप सावंत वय 38, या एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण जत तालुक्यातील रहिवासी आहेत. या अपघातात दहा वर्षाचा वरद सावंत गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुलगा गंभीर जखमी
या अपघातात मयुरी सावंत आणि वरद गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, वरदची प्रकृती गंभीर अस्लयाने त्याला सांगलीच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हे सर्वजण भाड्याने कार घेऊन देवदर्शनासाठी गेले होते. या अपघातात चालकासह पाच जण जागीच ठार झाले आहेत.
उपचारासाठी नेत असताना मृत्यू
चार जणांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. चालक दत्ता हा जखमी होता. त्यास उपचारांसाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मोठा अपघात घडल्याने अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जत ग्रामीण रुग्णालयात देखील मोठी गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक राजेश रामआघरे यांनी तातडीने भेट देऊन घटनास्थळी भेट दिली.