Chandrapur ACB | चंद्रपुरात 50 लाखांची लाच घेणारे जेलमध्येच, 22 मेपर्यंत जिल्हा कारागृहात रवानगी, कंत्राटदारांची चौकशी सुरू
नागपूर, ब्रह्मपुरी व चंद्रपूर येथील कार्यालय सील करण्यात आले. त्यामध्ये काही आक्षेपार्ह व कागदपत्रे सापडलेत. त्या आधारावरच आता नागपूर आणि चंद्रपूर येथील 8 कंत्राटदारांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती.
चंद्रपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मृद व जलसंधारण विभागातील (Department of Soil and Water Conservation) 3 लाचखोर अधिकाऱ्यांना 3 मे रोजी अटक केली होती. त्यामध्ये कविजीत पाटील, श्रावण शेंडे अणि रोहित गौतम यांचा समावेश होता. या तिन्ही अधिकार्यांनी 81 लाख रुपयांची लाच मागितली होती. तिघांच्याही न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी 9 मे रोजी संपली. त्यामुळं त्यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर (District and Sessions Court) हजर करण्यात आले. तपास अधिकार्याने पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने या तीनही आरोपींची 22 मेपर्यंत जिल्हा कारागृहात (District Jail) रवानगी केली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने या तिघांचाही जामिनाचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे कविजीत पाटील, श्रावण शेंडे आणि रोहीत गौतम यांच्या अडचणीत वाढ झालीय. सध्यातरी त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.
8 कंत्राटदारांना चौकशीसाठी नोटीस
मृद व जलसंधारण विभागातील तीन मोठ्या अधिकार्यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली. आता या विभागात कोट्यवधी रुपयांची कामे करीत असलेल्या चंद्रपूर आणि नागपूर येथील 8 कंत्राटदारांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी 6 मे रोजी नोटीस पाठविल्याने कंत्राटदारांचे धाबे दणाणले. नागपूर, ब्रह्मपुरी व चंद्रपूर येथील कार्यालय सील करण्यात आले. त्यामध्ये काही आक्षेपार्ह व कागदपत्रे सापडलेत. त्या आधारावरच आता नागपूर आणि चंद्रपूर येथील 8 कंत्राटदारांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. इंद्रकुमार उके, शुभम शेख, राजेंद्र चौधरी, गमे यांच्यासह अन्य कंत्राटदारांना 8 मे रोजी चौकशीला हजर राहण्यास बजाविले होते. मात्र, काही कंत्राटदार चौकशीला गेले तर काहींनी पाठ फिरविली.
आणखी 6 कंत्राटदार हिट लिस्टमध्ये
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता कंत्राटदारांची चौकशी सुरू केली. 6 मे रोजी 8 कंत्राटदारांना चौकशीला उपस्थित राहण्याच्या सूचना एसीबीने केल्या. आता आणखी 6 कंत्राटदार हिट लिस्टमध्ये आहेत. जुन्या 8 ची चौकशी झाल्यानंतर नागपूर, वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर येथील आणखी 5 ते 6 कंत्राटदारांना व काही अधिकार्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. मृद व जलसंधारण विभागासाठी चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या तीन जिल्ह्यात विजय घाटोळे यांनी सर्वेक्षणाचे काम केले होते. केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी त्यांनी या कार्यालयाच्या वारंवार खेटा घातल्या. बिल काढण्यासाठी घाटोळे यांना लाच मागण्यात आली होती.