Virar news : बोगस कागदपत्रांच्या आधारे इमारती उभ्या करुन ग्राहकांची फसवणूक, विरारमध्ये मोठे रॅकेट उघड
विरारमध्ये बोगस इमारतींचे प्रमाण वाढले आहे. केवळ ग्राहकांचीच नाही तर शासनाची फसवणूक हे रॅकेट करत होते. मात्र आता या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
विरार / 18 ऑगस्ट 2023 : प्रशासनाचे बनावट रबरी शिक्के आणि लेटर हेड बनवून 55 बोगस इमारती उभ्या करणारे मोठे रॅकेट विरार पोलिसांनी उघड केले. यानंतर 12 दिवसांनी 55 पैकी, विरार पूर्व कारगिल नगरमधील गुरुकृपा एक आणि दोन अशा दोन इमारतींवर वसई विरार महापालिकेने गुरुवारी रात्री पहिला गुन्हा विरार पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. यात जमीन मालकासह 7 विकासकावर गुन्हा दाखल झाला आहे. 2016 साली मयत झालेल्या आर्किटेक्टचा प्लॅन नुसार इमारती उभी केली असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्यामुळे जसजसे गुन्हे दाखल होतील तसतसे आणखी किती धक्कादायक खुलासे बाहेर येणार हे पाहावे लागणार आहे.
एकूण सात जणांवर गुन्हा दाखल
विरार पूर्व कारगिल नगरमधील 55 इमारतीच्या बोगस रॅकेटमध्ये गुरुकृपा नावाची इमारत आहे. गुरुवारी रात्री या इमारत बांधणारे विकासक आणि जमीन मालक अशा 7 जणांवर वसई विरार महापालिकेने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही इमारत ज्या आर्किटेक्टच्या प्लॅननुसार उभी आहे. त्या के. डी. मिस्त्री यांचा 2016 ला मृत्यू झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मयत आर्किटेक्टचा बोगस प्लॅन लावून ही इमारत उभी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात बोगस कागदपत्र बनवून, शासन आणि ग्राहक यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
विरार पूर्व गास कोपरी या परिसरातील रुद्राश अपार्टमेंट या इमारतीवरून बनावट रबरी शिक्के, बनावट प्रशासनाचे लेटर हेड बनवून 55 इमारती उभ्या केल्याचे मोठे रॅकेट 7 ऑगस्ट रोजी विरार पोलिसांनी उघड केले होते. यात नाझिया खान या फसवणूक झालेल्या महिलेने प्रथम पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पण तिच्या तक्रारीची प्रथम पोलिसांनी दखल घेतली. पण काल तिच्याही फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी विरार पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. आता त्या महिलेला ही बिल्डरकडून धमक्या येत असल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे.