महाविद्यालयीन विद्यार्थिनींना येवल्याला चालली होती बस, भरधाव डंपरने मागून धडक दिली अन्…
कोपरगावहून महाविद्यालयीन विद्यार्थिनींना घेऊन येवल्याला चाललेल्या बसला भरधाव डंपरने धडक दिली. दैव बलवत्तर म्हणून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोपरगाव / मनोज गाडेकर : महाविद्यालयीन विद्यार्थिनींना घेऊन कोपरगावहून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसला एका भरधाव डंपरने पाठीमागून धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. येवला रोडवरील शिव ऑटो सर्विस स्टेशन समोर दुपारी 12 वाजता ही घडली. या घटनेत 8 ते 10 विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटना घडल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून डंपर ताब्यात घेतला. डंपर चालक मात्र फरार झाला. ज्या डंपरने खाजगी बसला पाठीमागून धडक दिली, त्याला नंबर प्लेट सुध्दा नव्हती. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सदर डंपरमध्ये काय वाहतूक होत होतं? त्याचा परवाना होता का? याचा तपास आता पोलिसांनी करणं गरजेचं आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती बस
कोपरगाव शहरातील महिला महाविद्यालय येथून विद्यार्थिनींना घेऊन एक खाजगी बस येवल्याच्या दिशेने चालली होती. मागून आलेल्या डंपरने बसला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये बस आणि डंपर दोघांच्याही काचा फुटून नुकसान झाले आहेत. यावेळी बसमधील विद्यार्थिनी घाबरल्याने रडत होत्या. घटना घडली त्यावेळेस संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे हे तेथून जात होते. त्यांनी आपली गाडी थांबवून विद्यार्थिनींची विचारपूस केली तसेच संजीवनीची रुग्णवाहिका बोलावून विद्यार्थिनींना रुग्णालयात पाठवले.
डंपर चालक फरार
यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि डंपर ताब्यात घेतला. परंतु डंपर चालक पळून गेला होता. त्यानंतर महानंदचे अध्यक्ष तथा महिला महाविद्यालयाचे संचालक राजेश परजने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विद्यार्थिनींची विचारपूस करून ज्यांना दुखापत झालेली नाही अशांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. सुदैवाने या घटनेत कुणालाही मोठी दुखपत झालेली नाही.