असंही एक एकत्रित कुटुंब ज्यांची सदस्य संख्या ५१, अशी प्रेरणा येते कुठून?
पाचही भाऊ संयुक्तपणे राहत आहेत. यांच्या कुटुंबात सहा भावांना तेरा मुले, तेरा सुना आणि तीन मुली अविवाहित आहेत. तसेच बारा नातवंड असा ५१ सदस्यांची संख्या आहे.
व्यंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : सध्या समाजात अनेक कुटुंबातील सदस्य वेगवेगळे राहून आपले जीवन जगतात. परंतु याला एक अपवाद म्हणून कोरची तालुक्यातील सोहले गावातील कवर समाजातील गंगाकाचुर कुटुंब ठरत आहे. या कुटुंबातील ५१ सदस्य एकत्रितपणे प्रेमभावाने राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्व. कुवरसिंग सुकलाल गंगाकाचूर (१०५ वर्षे) रा. सोहले यांची पत्नी धनीबाई कुवरसिंग गंगाकाचूर (११० वर्षे) यांचे नुकतेच ९ मे २०२३ वृद्धपकाळाने निधन झाले. यांना सहा मुले आणि दोन मुली आहेत. एक मुलगा आणि एका मुलीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. सध्या पाच भाऊ आणि एक बहीण आहेत. हे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने राहतात.
पाच भावांना तेरा मुले, तेरा सुना
यातील पाचही भाऊ संयुक्तपणे राहत आहेत. यांच्या कुटुंबात सहा भावांना तेरा मुले, तेरा सुना व तीन मुली अविवाहित आहेत. तसेच बारा नातवंड असा ५१ सदस्यांची संख्या आहे. हे सर्व कुटुंब एकत्रित वास्तव्यास आहेत.
जोहारीलाल गंगाकाचूर सांभाळतात कुटुंबाची जबाबदारी
या पाच भावांपैकी तिसऱ्या नंबरचे जोहारीलाल कुवरसिंग गंगाकाचुर (६५ वर्षे) यांच्याकडे कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदारी आहे. यांना सर्वात मोठे भाऊ स्व. इंदलसिंग कुवरसिंग गंगाकाचुर (७४ वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या नंबरवर बिहारीलाल कुवरसिंग गंगाकाचुर (७० वर्षे,) शामसाय कुवरसिंग गंगाकाचुर (५९ वर्षे), शामसिंग कुवरसिंग गंगाकाचूर (५७ वर्षे), तिवारीलाल कुवरसिंग गंगाकाचूर (५५ वर्षे) असे भाऊ आहेत.
४० एकर शेती, एक ट्रॅक्टर
यापैकी शामसाय हे वनपाल या पदावरून निवृत्त झाले आहेत. तर, शामसिंग हे कुरखेडा तालुक्यातील कन्हारटोला येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहेत. गंगाकाचुर कुटुंबाला ४० एकर शेती आहे. घरात एक ट्रॅक्टर, चार मोटारसायकल असून ६० गुरे ढोरे आहेत.
एका वेळी सहा किलो तांदूळ, चार किलोची भाजी
कुटुंबातील प्रमुख म्हणून जोहारीलाल यांच्याकडे जबाबदारी आहे. यांचं मोठं भाऊ बिहारीलाल आहेत, पण सर्वस्वी कुटुंबातील मान जोहरीलाल यांनाच दिला जातो. जोहरीलाल हे सोहले गावातील ग्रामसभेचे अध्यक्ष आहेत. या कुटुंबाला एक वेळच जेवणात सहा किलो तांदूळ, तर चार किलोची भाजी लागतो. यासाठी सहा भावांपैकी तीन भावांच्या आठ सुना संयुक्तपणे प्रेमाने दोन्ही वेळचं स्वयंपाक बनवतात.
होळी आणि दिवाळी हे यांचे मोठे सण आहेत. खीर पुरी, उडीद दाळ वळा, सुका चावल पापळ, बेसन भज्जी, शंकरपाळ, अनारसा, गुलाबजामून अशा विविध प्रकारचे पदार्थ सणाच्या वेळी आठ सुना कमी वेळात बनवतात. यामुळे आर्थिक खर्च कमी लागतो आणि कुटुंबाला मदत होते.
कोरोना काळात शेतीचे काम धंदे बंद होते. तेव्हा घरीच विटा भट्टी लावण्यात आली. मालकीच्या शेतातील माती घरी आणून घरीच सर्व कुटुंब मिळून काम करून आपले उदरनिर्वाह केला होता. यांना मोठं आठवडी बाजार म्हटले तर कोरची हे आहे. कोटरा आणि छत्तीसगडमधील कोरचाटोला आहे.
उत्पन्नाचे सर्व पैसे जोहारीलाल यांच्याकडे
दर आठवड्याला दोन ते तीन हजारांचा भाजीपाला आणि किराणा लागतो. महिन्याच्या अंदाजे बारा ते तेरा हजार रुपये एवढा खर्च लागतो. विशेष म्हणजे सर्व भाऊ आणि सुना हे जोहारीलाल यांच्याकडे केलेल्या रोजी मजुरीचे आणि उत्पन्न झालेलं सर्व पैसे जमा करतात.