व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : तुम्हाला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर… तर सोनेपे सुहागा म्हणावं लागेल. कारण ते चित्रत केलं जातं. शिवाय प्रसिद्धीही मिळते. पण, ही संधी कुण्या साधारण व्यक्तीला नव्हे तर आत्मसमर्पीत व्यक्तीला मिळाली तर.. तर मग त्यांचा आनंदाचा पारावार उरणार नाही. होय हे खरं आहे. आत्मसमर्पीत नक्षली आता चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. गडचिरोली हा अतिसंवेदनशील जिल्हा. या जिल्ह्यात आदिवासी बांधव दुर्गम भागात राहतात. परंपरेनुसार ते आपले जीवनमान जगत आहेत. अशीच एक महिलांच्या बाबतीत परंपरा आहे. मासीक पाळीच्या वेळी महिला घरात राहत नाही. घराबाहेर एक छोटेसे घर बनवले असते, तिथ त्या राहतात. त्या घराबाहेरच्या छोट्याशा घराला कुर्माघर म्हणतात. या कुर्माघरावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
या चित्रपटासाठी तृप्ती भोईर आणि विशाल कपूर यांनी आज ऑडिशन घेतल्या. विशेष म्हणजे या ऑडिशन आत्मसमर्पित नक्षली महिला-पुरुषांच्या घेण्यात आल्या. तृप्ती भोईर आणि विशाल कपूर यांनी अगडबम, टुरिंग टॉकीज, नमस्कार जयहिंद, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, यासारखे चित्रपट निर्माण केले आहेत.
भविष्यात आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांना चित्रपट सृष्टीत संधी मिळावी, यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुढाकार घेतला. आत्मसमर्पीत नक्षल्यांनी चित्रपटात काम करावे. स्वतःची नवी ओळख निर्माण करावी, यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ऑडिशनदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता तसेच आत्मसमर्पन शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे उपस्थित होते.
कुर्माघर या चित्रपटाच्या निर्मात्या तृप्ती भोईर यांनी या ऑडिशन घेतल्या. यावेळी आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांनी ऑडिशन दिल्या. त्यांच्यासाठी हा एक नवीन अनुभव होता. यापैकी काही जणांना चित्रपटात संधी मिळणार आहे. यामुळे आत्मसमर्पीत नक्षली आनंदित दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्याजोगा होता.