उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे यांनी कोणतं षडयंत्र रचलं?, जसलोकच्या खोलीत काय घडलं?; नितेश राणे यांचा दावा काय?
बारसूतील आंदोलकांना हुसकावून लावण्याचे आदेश फडणवीस यांनी मॉरिशसवरून दिल्याचं राऊत म्हणत आहेत. हा तिथे कशाला गेला? आदेश मातोश्रीवरून आलेत....विनायक राऊतचा मोबाईल तपासा, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिले.
रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना इकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठकाही घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं, असा खळबळजनक दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचा आवाज काढून त्यांची नक्कलही केली.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी होते. ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहात होते. षडयंत्र रचत होते. माझे वडील आजारी आहेत. आता ते बरे होणार नाहीत असं आदित्य ठाकरे सांगायचे. त्यासाठी जसलोक रुग्णालयात बैठका झाल्या. जसलोकच्या कोणत्या रुममध्ये बैठका होत होत्या हे मी सांगू शकतो,. सीसीटीव्ही फुटेज देऊ शकतो. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून ते प्रकरण थांबलं, असा दावा करतानाच बाप आजारी असताना आदित्य ठाकरे हे वरुण सरदेसाईंना घेऊन दावोस गेले होते. तिथे ते मजा मारत होते, असा दावाही त्यांनी केला.
तुम्हीही सर्व्हे केला होता काय?
70 टक्के लोक रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने आहेत असं सांगायला तुम्ही काय सर्व्हे केला होता काय? असा सवाल संजय राऊत यांनी राज्य सरकारला विचारला होता. त्यालाही नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारने सर्व्हे केला नव्हता तर प्रकल्पाच्या विरोधात लोक आहेत हे पाहण्यासाठी राऊतांनी तरी सर्व्हे केला होता काय?
70 टक्के लोक सरकार सोबत नाही हे राऊत यांना कसं कळलं? असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे यांचा आदेश त्यांचा शिपाईही मानत नाही. बारसूतील लोक या मानणार? आधी राजन साळवी यांचं मन वळवा मग पुढच्या गप्पा मारा. जो विषय राजन साळवी यांना समजतो तो उद्धव ठाकरे यांना का कळत नाही? असा सवाल त्यांनी केला.
आज बैठक
उदय सामंत आज बैठक घेत आहेत. लोकांची भूमिका जाणून घेत आहेत. काल कलेक्टर गेले होते. तेही बैठका घेत आहेत. लोकांशी बोलत आहे. ठाकरे गटाला कोकणाचं काही पडलं असेल तर लोकांचं मन वळण्याचा ते प्रयत्न करतील, असंही ते म्हणाले.