कोल्हापूर : उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय पवार म्हणाले, मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली टीका अशोभनीय आहे. एका मंत्र्यांनी अशी टीका करणे योग्य नाही. गेल्या आठ दिवसात ते उर्मट बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पायउतार करावं. अन्यथा ते तुम्हालाच गोत्यात आणणार. मंत्री पद टिकवण्यासाठी अशी टीका करावी लागते. ते स्वतः बोलत नाही त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. पण, अशीच वक्तव्य सुरू राहिली तर याचा महाराष्ट्रात उद्रेक होईल, असा इशारा संजय पवार यांनी दिला.
शिवसैनिकच नाही तर बाळासाहेबांवर प्रेम करणारी लोकं याला उत्तर देतील. आज ना उद्या श्रीलंकेत जसं घडलं तसं इथे घडायला वेळ लागणार नाही.
संजय पवार म्हणाले, टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला जाणार हे राज्य सरकारचे मोठं अपयश आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा भाजपचा अनेक वर्षापासूनचा डाव आहे.
त्या दृष्टीने भाजपची कूच सुरु आहे. महाविकास आघाडी काळातच प्रकल्प गुजरातला गेला. म्हणणाऱ्या उदय सामंत यांनी पुरावे द्यावेत. उदय सामंत कोल्हापुरात आल्यास उद्योगधंदे गुजरातला जात असल्याबद्दल जाब विचारणार असल्याचंही संजय पवार म्हणाले.
ज्या मातोश्रीमुळे नारायण राणे मोठे झाले, त्यांच्यावर टीका करताना भान ठेवलं पाहिजे. ॲक्शनला अशीच रिएक्शन येणार
असंही संजय पवार यांनी सांगितलं.
बच्चू कडू यांच्याबाबत बोलताना संजय पवार म्हणाले की, बच्चू कडूंप्रमाणेच शिंदे गटात गेलेल्या अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. दिवसेंदिवस ही अस्वस्थता वाढत जाणार आहे. त्यामुळे सरकार फार दिवस टिकणार नाही. तिकडे गेलेले मूळचे शिवसैनिकच आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.