उस्मानाबाद : एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) व मारहाण (Beating) केल्याप्रकरणी एका आरोपीस उस्मानाबाद येथील कोर्टाने 20 वर्ष कारावासाची व 7 हजार दंडाची शिक्षा ठोठवली आहे. विलास कोंडिबा गलांडे असे शिक्षा (Punishment) सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवासी आहे. या प्रकरणात 16 साक्षीदार कोर्टात तपासले गेले. यात घटना व घटनेनंतर साक्षीदार, मोबाईल लोकेशन महत्वाचे पुरावे ठरले तर आरोपीला मुलीने अटक केल्यानंतर ओळखले. कलम 376(3) व बाल लैंगिक अत्याचार कलम 4 नुसार दोषी ठरवत 20 वर्षाची शिक्षा दिली. विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी या प्रकरणात कोर्टात बाजू मांडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे महत्वपूर्ण ठरले.
तुळजापूर तालुक्यातील 2018 साली ही अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी विलास गलांडेला कोर्टाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. तुळजापूर तालुक्यातील एक 13 वर्षाची मुलगी 25 जून 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता लागली राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या शेतात नैसर्गिक विधीसाठी गेली होती. तिला तेथे जाताना पाहून आरोपी हा तिच्या मागे गेला आणि उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीला मारहाण करून त्याने तेथून पळ काढला. आरोपी हा पिकअप ड्रायव्हर असून त्याने मुलीला पाहून वाहन थांबविले व तिच्या मागे जाऊन हे कृत्य केले.
घटनास्थळी बलात्कार करून आरोपी ड्रायव्हरने पळ काढला. मात्र त्याला लोकांनी पळ काढताना पाहिले. साक्षीदार, प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या माहितीवरून तुळजापूर शहरात आलेल्या व गेलेल्या वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. दिलेल्या वर्णनानुसार गाडीचा शोध घेऊन आरोपीला सोलापूर येथून अटक केले. तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक वनिता वाघमारे यांनी काम पाहिले. उस्मानाबाद येथील विशेष न्यायाधीश सचिन जगताप यांनी आरोपीला 20 वर्ष कारावास आणि 7 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. (Accused sentenced to 20 years in prison for sexual harrassment a minor girl in Osmanabad)