पावसाचा सांगावा घेऊन आफ्रिकन पाहुणा थेट कृष्णाकाठावर, पर्यटक अनुभवणार सुरांची रानमैफल; किती महिने मुक्काम?
पावसाचं आगमन होण्यापूर्वीच पावसाचा सांगावा घेऊन एक आफ्रिकन पाहुणा आला आहे. हा आफ्रिकन पाहुणा पलुसच्या कृष्णकाठावर दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकल आहे.
सांगली : आफ्रिकन पाहुणा चातक कृष्णकाठावर आला आहे. गतवर्षाप्रमाणे यंदाही त्याचं उशिराच आगमन झालं आहे. आभाळाकडे डोळे लाऊन बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची वर्दी निसर्गातील पक्षांकडून मिळत असते. शेतकऱ्यांना पावसाची वर्दी देणाऱ्या या पक्षांपैकी एक पक्ष म्हणजे हा चातक. हा चातक पक्षी आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन पलुसच्या कृष्णकाठावर आल्याने बळीराजाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता कृष्णकाठावर पर्यटकांना सुरांची रानमैल अनुभवता येणार आहे. पावसाळ्याचे चार महिने चातक पक्षी कृष्णकाठावर मुक्काम ठोकून राहणार आहे.
कुळीव कुळीव म्हणणारी कोकीळा, शेतकऱ्यांना पेरते व्हा अशी साद घालणारा पावशा, हे नेहमीच बळीराजाला पावसाच्या आगमनासाठी सज्ज ठेवत असतात. त्याचबरोबर आणखी एक पाहूणा उशीरा का होईना आज थेट आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन पलूस च्या कृष्णाकाठावर दाखल झाला आहे. हा पाहूणा म्हणजे चातक. काळ्या पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर एखाद्या राजकुमाराच्या डोक्यावर शोभावा असा काळा तुरा असतो. त्याचा साळुंकी एवढा आकार, लांब शेपूट, शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा असतो. हनुवटी, मान आणि पोटाचा भाग पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा चातक पक्षी सहज ओळखतो.
चार महिने मुक्काम
शेपटीतील पिसांची टोके पांढरी असतात. डोळे तांबडे तपकिरी, चोच काळी आणि पाय काळसर निळे असतात. हे एकेकटे किंवा यांची जोडी असते. हा चातक पक्षी सध्या पलुस तालुक्यातील कृष्णाकाठावर दाखल झाला आहे. कोकीळा, पावशा, कारूण्य कोकीळा, बुलबुल, रॉबीन या गाणाऱ्या पक्षांसोबतच चातकाच्या सुरांची रानमैफल कृष्णाकाठावर रंगते आहे. तर या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे.
दोन चातक पाहायला मिळाले
रविवारी कृष्णाकाठ आमणापूर येथील नागोबा कट्टा परिसरात 2 चातक पहायला मिळाल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली. चातकाची वीण जूनपासून ऑगस्टपर्यंत होते. मीलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात. कोकिळेप्रमाणे याही पक्ष्यात भ्रूण परजीविता दिसून येते. मादी आपली अंडी छोट्या सातभाई पक्ष्याच्या घरट्यात घालते.
सातभाई हा लहान पक्षी असल्यामुळे भिऊन घरट्यातून पळून जातो आणि काही आडकाठी न येता तिला सातभाईच्या घरट्यात अंडे घालता येते. अंड्याचा रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणेच आकाशी असतो. सप्टेंबरच्या सुमारास सातभाईची पिले अंड्यांतून बाहेर येतात. त्यांमध्येच चातकाचे पिल्लू असते. चातकाचे पिल्लू तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखांवर पिवळसर आडवा पट्टा असतो, असंही संदीप नाझरे यांनी सांगितलं.