“आमच्यावर पहिल्यापासून हेच आरोप झाले”; विखे पाटील-शिंदे वादामुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर
खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी चाळीस वर्षे अहमदनगर जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे. त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप केले गेले होते, त्यामुळे आमच्यावर पहिल्यापासून या प्रकारचे आरोप झाले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राहाता/अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यापासून भाजपअंतर्गत त्यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. मात्र बाजार समितीच्या सभापती निवडणुकीच्या कारणांवरून भाजपचे आमदार राम शिंदे यांनी विखे पाटील कुटुंबीयांवर जाहीर आरोप करत, पक्षांतर्गत असलेला वाद त्यांनी चव्हाट्यावर आणला. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आमदार राम शिंदे यांनी विखे पाटील पिता पुत्रांवर जाहिर आरोप करत विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातात, त्याच पक्षाविरोधात काम करतात असा जाहिर आरोप त्यांनी केला होता.
त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशी जाहिर वक्तव्य राम शिंदे यांनी न करता त्यांनी पक्षश्रेष्ठींजव आपली भूमिका मांडावी असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.
त्यामुळे या वादावर आता कधी तोडगा निघणार असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. विखे-पाटील वाद गेल्या काही दिवसांपासून उफाळून येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचेही भाजपच्या नेत्यांनी सांगितले.
आमदार राम शिंदे यांनी जाहिर वक्तव्य करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींजवळ भूमिका मांडावी, कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गैरसमाजातून ते पक्षातंर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आणत असल्याचे सांगत त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे असंही त्यांनी म्हटले आहे.
राम शिंदे यांनी असे जाहिर आरोप करण्यापेक्षा त्यांनी पक्षाच्या चौकटीत राहून यासंदर्भात चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होतो आहे असं स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
त्याच बरोबर पक्षांतर्गत असलेले वाद आणि भेद-मतभेद त्याविषयी राम शिंदेंनी जाहिरपणे मतप्रदर्शन टाळलं पाहिजे असा सल्लाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
राम शिंदे यांनी जाहिर वक्तव्ये केली असली तरी त्यांच्या त्या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य नाही, किंवा पक्षांतर्गत कोणतीही गटबाजी नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी चाळीस वर्षे अहमदनगर जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे. त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप केले गेले होते, त्यामुळे आमच्यावर पहिल्यापासून या प्रकारचे आरोप झाले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
या विषयावर अधिक भाष्य करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींसमोर शहानिशा झाली पाहिजे असंही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. भविष्यकाळात असे आरोप होऊ नये म्हणून पक्षांमध्ये आचारसंहिता असावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.