व्येंकटेश दुडमवार, अहेरी (गडचिरोली) : अहेरी ते सिरोंचा 107 किलोमीटर अंतर आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने पावसाळ्यात रस्त्यावर मुरूम टाकून ठेवले. त्यामुळे अनेक वाहने चिखलात रुतताना दिसतात. या रस्त्यावर अजूनही बरेच ठिकाणी खड्डे आहेत. नाईलाजास्तव खासगी वाहनधारकांना अन्य मार्गाने ये-जा करावे लागते. खराब बस, रस्ते नादुरुस्त यामुळे 107 किलोमीटर अंतर कापायला पाच ते सहा तास लागतात. त्यात या मार्गावर चालविले जाणारी एसटी बस गळकी असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
राज्याचे परिवहन महामंडळ नव्या बस आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण, आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त गडचिरोलीतील बसची दुरावस्था झालेली दिसते. बसमध्ये छत्री घेऊन पावसात प्रवास करावा लागल्याची घटना समोर आली. त्यामुळे बसचे आरोग्य किती धोक्यात आहे, हे यातून दिसून येते. बसचे आरोग्य चांगले नसेल तर चालक-वाहक तसेच प्रवाशांचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पहिल्याच पावसात लांब पल्ल्याची बस गळत होती. त्यामुळे प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. अहेरी ते सिरोंचा रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बसमधील ही घटना आहे. अहेरी आगारातील बसची अशी दुरावस्था दिसून येते. अशा गळक्या बस छोट्या प्रवासासाठी एकवेळ ठिक आहेत. पण, १०० किलोमीटरचे अंतर असलेल्या अहेरी-सिरोंचा बसमध्ये हा प्रकार समोर आला. त्यामुळे एस महामंडळाविरोधात प्रवासी संतप्त झाले आहेत.
अहेरी आगारात अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा आणि गोंडपिपरी हे सहा तालुके येतात. अहेरी आगारातील अनेक बस नादुरुस्त आहेत. मागील अनेक वर्षांपासून अहेरी आगारात नवीन एसटी बसची मागणी करण्यात येत आहे. परंतु, अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे जुन्या गडक्या, पडक्या बसवर आगाराचं काम सुरू आहे.
अहेरी आगारातील काही एसटी बसेस रस्त्यात खराब होतात. मग, प्रवाशांना मध्येच खाली उतरावे लागते. जुन्या बस असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. मुलचेरा आणि चंद्रपूर रस्त्यावर एकच दिवशी दोन दुर्घटना घडल्या. रस्त्यावरील खड्डे, एसटी बसच्या घटलेल्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पहिल्याच पावसात एसटीमध्ये जलधारा दिसल्या. त्यामुळे प्रवाशांना आता चक्क एसटी बसमध्ये डोक्यावर छत्री धरून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली.