Reality Check | साईबाबा संस्थानचा पैसा मशिदीसाठी वापरला? व्हिडीओतला दावा खरा की खोटा?
साईबाबा संस्थानने मशिदसाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल माध्यमात व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. या व्हिडीओवरुन शिर्डी ग्रामस्थांकडूनही संताप व्यक्त केला जातोय. या व्हिडीओची नेमकी सत्यता काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शिर्डी : गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर साईबाबा संस्थानने भाविकांकडून जमा होणारी दानाची रक्कम एका मशिदसाठी दिल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत दानपेटीतून पैशांची गोण भरुन एका प्रार्थनास्थळी नेलं जातं, नंतर तिथे पैसे मोजले जातात, असं दाखवण्यात आलं. साईबाबा संस्थानने दानाचा आलेला पैसा मशिदीसाठी दिल्याचा दावा यात करण्यात आला आहे. संबंधित व्हिडीओला माथं भडकवणारं कॅप्शनदेखील देण्यात आलं आहे. “शिर्डीच्या साईंच्या झोळीत टाण्यात आलेली हिंदुंची कमाई कुठे जातेय ते तुम्हीच पाहा. या व्हिडीओला इतकं व्हायरल करा की देशातील प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचेल, जे डोळे असूनही आंधळे बनले आहेत”, असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
शिर्डी ग्रामस्थ आक्रमक
शिर्डी ग्रामस्थही आता अशा अप्रचारामुळे आक्रमक झाले आहेत. साईबाबा संस्थानला आणि पर्यायाने शिर्डीला बदनाम करणयाचं हे कारस्थान असल्याचं त्यांनी म्हंटलंय. संबधित समाज माध्यम आणि अपप्रचार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.
साईबाबा संस्थानचं नेमकं स्पष्टीकरण काय?
मात्र साईबाबा संस्थानने असा कुठलाही निधी दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच तशाप्रकारे निधी देण्याची तरतूदच नसल्याचं साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी म्हंटलंय. संस्थानकडे जमा होणारी दानाची रक्कम विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केली जाते. या निधीचा विनियोग करताना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते, असे देखील तांबे यांनी स्पष्ट केलंय.
साईबाबा संस्थानचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
“गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानच्या संबंधित वादग्रस्त आणि संभ्रम निर्माण करणारे मेसेज, व्हिडीओ काही समाजकंठकांकडून सोशल माध्यमांवर पसरवले जात आहेत. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेऊ नका”, असं आवाहन साईबाबा संस्थानसह शिर्डी ग्रामस्थांनी केलंय.
वादग्रस्त पोस्टवर विश्वास ठेवणं टाळा
सोशल मीडियावर सातत्याने काही भडकवणारे फोटो, व्हिडीओ आणि माहिती देवून तरुणांना भडकवण्याचं काम केलं जातं. विशेष म्हणजे अनेकजण नको असलेला वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न देखील करतात. पण त्यांनी तसं करणं टाळलं तर वाद होण्याचं कारणच नाही.
नुकतंच राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळाली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांवरुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांडून करण्यात आला. पण अशा घटना टाळता येतील यासाठी देशाच एक जबाबदार नागरीक म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.